– क्रांतिसूर्य माळी समाजाचा पुढाकार : गौरवगीत व नृत्य सादर
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : क्रांतिसूर्य माळी समाज पोटेगावच्या वतीने स्थानिक आदिवासी सांस्कृतिक भवनात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिकादिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्धाटन शासकीय आश्रमशाळा पोटेगावचे मुख्याध्यापक मंगेश ब्राम्हणकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत पोटेगावच्या सरपंच अर्चना सुरपाम होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोटेगाव शासकीय आश्रमशाळेचे माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे व जिल्हा माळी समाज संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते हरिदास कोटरंगे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर विस्तृत मार्गदर्शन केले व त्यांच्या विचारातून सामाजिक दृष्टीकोन असलेला समाज घडवून देशाची लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा कुमरे, उपसरपंच नरेंद्र मोहुर्ले, तंंमुसचे अध्यक्ष राजेश मानकर, ग्रा. पं सदस्या ज्योती अलाम, योगिता मानकर, प्रतिमा मोहुर्ले, माळी समाज संघटनेचे अध्यक्ष वामन वसाके, कोषाध्यक्ष मन्साराम गुरनुले, विदर्भ विद्यालयाचे प्राचार्य विलास बल्लमवार, प्रविण भोयर, जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा पोटेगावचे शिक्षक सुधाकर काटलाम, खुशाल गावडे, दिवाकर पोरतेट, लोमेश कुकूडकार, दिवाकर फुलझेले, सचिन सुरपाम, निर्मलाताई सुरपाम, शंकर सडमाके, ज्ञानेश्वर मुंजनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुलींनी गौरवगीत व नृत्य सादर केले. कार्यक्रमापूर्वी गावातील मुख्य रस्त्यातून समाज प्रबोधन प्रभातफेरी काढण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाज संघटनेचे सचिव लक्ष्मण सोनुले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन निलिमा मोहुर्ले व आभार प्रदर्शन नैना गुरनुले यांनी केले. कार्यक्रमाला समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.