ओबीसी आरक्षणासाठी शेकाप राज्यव्यापी आंदोलन उभे करणार : भाई रामदास जराते

157

– शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची पार पडली बैठक

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजप, काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सत्तेच्या हव्यासापोटी आरक्षणाचा खेळखंडोबा करुन ओबीसी समाजाच्या अनेक पिढ्या उध्वस्त केल्या आहेत. ओबीसींवरचा हा अन्याय दूर करण्यासाठी घटनादुरुस्ती करून आरक्षणाची तरतूद करणे हाच सक्षम पर्याय आहे. त्यासाठी राज्यातील प्रमुख ब्राम्हणेतर पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन उभे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केले.

स्थानिक पत्रकार भवनात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना भाई रामदास जराते बोलत होते. यावेळी जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई वेळदा, भाई अशोक किरंगे, सरपंच दर्शना भोपये, डॉ. गुरुदास सेमस्कर, चंद्रकांत भोयर, राजकुमार प्रधान, संजय बोधलकर, कार्यालयीन चिटणीस भाई श्रीधर मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.

भाई रामदास जराते पुढे म्हणाले की, देशात ८५ टक्के जनता ही मागास प्रवर्गात मोडणारी आहे. त्यामुळे ८५ टक्के जनतेकरिता ५० टक्के आरक्षणाची व्यवस्था हा अन्याय असून हा अन्याय दूर करण्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागली तरी ती केली पाहिजे अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस राहिलेले दिवंगत पी. बी. सावंत यांनी जाहीर पणे मांडली होती. आजही हिच भूमिका शेतकरी कामगार पक्षाची असून सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वात यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभे करण्यात येत असल्याने ओबीसी, बहुजन समाजाने भाजप, काॅंंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचा नाद सोडून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही भाई रामदास जराते यांनी केले.

दरम्यान कार्यकर्त्यांच्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील खाणींना विरोध, ढिवर समाजाचे कोसा रानाच्या जमिनीचे पट्टे, मा. मा. तलावाची मालकी, गडचिरोली शहरातील वस्त्यांचे अतिक्रमणाचे पट्टे आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यावर येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि गडचिरोली नगरपालिका निवडणुकीला सामोरे जाण्याचा आणि त्याकरिता पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे नियोजन करण्यात आले.

बैठकीला भास्कर ठाकरे, गणेश बोबाटे, सत्तू गावळे, धनराज भोपये, हिराजी चिचघरे, रेवनाथ मेश्राम, देवा भोयर, किसन साखरे, शालीक भोयर, रमेश गेडाम, बाजीराव आत्राम, भुषण बांबोडे, पत्रू कोटगले, देवेंद्र लाटकर, वसंत वधेलवार, शिल्पा लटारे, छाया भोयर, रजनी खैरे, कुसूम नैताम, चंदा सोनटक्के, शालु आभारे, सतीका खोब्रागडे, खुशाली बावणे, मनिषा हजारे, धारा बन्सोड, विमल क्षीरसागर, आरती मडावी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.