– ना. विजय वडेट्टीवार व शिवानी वडेट्टीवार यांची पत्रपरिषदेत माहिती
– विजय-किरण फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत 14 डिसेंबरला होणार वाटप
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : विजय – किरण फाऊंडेशनच्या माध्यमातून मिळालेल्या सीएसआर फंडातून अखिल भारतीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील 10 हजार व चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी क्षेत्रातील 5 हजार विद्यार्थिनींना मोफत ई- सायकल देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम येत्या, 14 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता येथील जिल्हा परिषद परिसरातील मैदानावर आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे मदत, पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन व बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार व प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
युवती व महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रियंका गांधी विशेष प्रयत्नशील आहेत. आपली कर्मभूमी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थिनींना वाहतुकीच्या अपुऱ्या सोयी सुविधांमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. बहुतांश विद्यार्थिनी शाळेत पायदळ येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील 10 हजार विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटपाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवानी वडेट्टीवार यांनी यावेळी दिली. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जि. प. सदस्य अँड. रामभाऊ मेश्राम, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, पंकज गुड्डेवार, पांडुरंग घोटेकर आदींची उपस्थिती होती.