रोजगार हमीची थकीत मजुरी मजुरांच्या खात्यावर जमा

20

– शेतकरी कामगार पक्षाच्या पाठपुराव्याला यश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात विविध कामे हातात घेण्यात आली असून मागील चार महिन्यांपासून या कामावरील मजुरांना मजुरी मिळाली नसल्याने होळीसारखा महत्वाचा सण अंधारात गेला आहे. त्यामुळे आपण वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून रोजगार हमी योजनेच्या मजुरांची मजुरी तातडीने मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या पाठपुराव्यामुळे जिल्हाभरातील रोजगार हमीच्या कामावरील मजूरांची थकीत असलेली ३० कोटींहून अधिकची मजुरी रक्कम मजुरांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना १२ एप्रिल रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, सध्या लग्नसराईचे दिवस सुरू झालेले आहेत. मात्र रोजगार हमीच्या कामावर राबून चार महिने झाल्यानंतरही मजुरीचा रुपयाही मजुरांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत रोजगार हमीच्या मजुरांकडे दुर्लक्ष होणे दुर्दैवी आहे. त्यामुळे आपण प्राधान्याने याकडे लक्ष द्यावे. दर आठवड्याला मजुरी देणे बंधनकारक असतानाही चार महिण्यांचा विलंब झाल्याच्या कारणास्तव अतिरिक्त रक्कमेसह तातडीने जिल्ह्यातील सर्व मजुरांची थकीत मजुरी वाटप करावी. याबाबत प्रशासनाने दखल घेत १४ एप्रिल पर्यंतची संपूर्ण मजुरी मजुरांच्या खात्यावर जमा करणे सुरू केले आहे.

थकीत मजुरी मिळाल्याने जिल्हाभरातील रोजगार हमी योजनेच्या मजूरांनी शेतकरी कामगार पक्ष आणि जिल्हाधिकारी संजय दैने यांचे आभार मानले आहेत.