Home गडचिरोली धानाचे चुकारे कधी देणार साहेब ?

धानाचे चुकारे कधी देणार साहेब ?

104

महिनाभरापासून धानाचे चुकारे थांबले : विश्वजित कोवासे यांचा आरोप

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यात शेकडो शासकीय धान खरेदी केंद्रावरून हमी भावाने धानाची खरेदी केली जात आहे. यामुळे अनेक शेतकरी खुल्या बाजारात धानाची विक्री न करता शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करीत आहेत. मात्र, मागील एक महिन्यापासून विकलेल्या धानाचे चुकारे अजूनपर्यंत झाले नसल्याने साहेब धानाची खरेदी केली पण पैसे कधी देणार, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. शासनाकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप प्रदेश युवक कॉंग्रेसचे महासचिव विश्वजित कोवासे यांनी केला आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धान खरेदीसाठी नोंदणी उशिरा सुरू करण्यात आली. काही तांत्रिक कारणामुळे शासकीय हमी भावाने धान खरेदी करणाऱ्या संस्थांनी नोंदणीच सुरू केली नव्हती. त्यानंतर नोंदणी सुरू होऊन जवळपास डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष धानाची खरेदी सुरू करण्यात आली. शासनाने खरीप हंगामात धानाचे उत्पादन चांगले आले असे गृहीत धरून कुणाचीही मागणी नसताना धानाच्या विक्रीसाठी प्रति एकर क्विंटलमध्ये वाढ करून १३.५० केली. खुल्या बाजारातील दर व शासकीय दर लक्षात घेऊन शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करीत आहेत. सुरुवातीला नियमित धानाचे चुकारे करण्यात येत होते. त्यामुळे अनेक शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली. मात्र आता एक महिन्यापासून धानाचे चुकारे थकीत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी आहे काय? असाही प्रश्न कोवासे यांनी उपस्थित केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय धानाची खरेदी करणाऱ्या संस्थांकडून धानाचे देयक (बिल) बनवून संबधित कार्यालयाकडे सदर केले जात आहे. ११ डिसेंबर २०२३ पासून सदर केलेल्या देयकांचे चुकारे थकीत आहे. यामुळे पुढे धानाची खरेदी सुरु ठेवायची कि नाही, असा प्रश्न धान खरेदी करणाऱ्या संस्थांपुढे उपस्थित होत असल्याचे सांगितले जात आहे. यातच काही ठिकाणी धानाची खरेदी बंद असल्याची ओरड सुद्धा होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन शासनाने धानाचे चुकारे त्वरित करावे, अशी मागणीही प्रदेश युवक कॉंग्रेसचे महासचिव विश्वजित कोवासे यांनी केला आहे.

मागील एक महिन्यापासून चुकारे थकीत होते, ही बाब खरी असली तरी नुकतेच शासनाकडून ३५ ते ४० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यामुळे धानाचे चुकारे करण्यास सुरुवात झाली असून काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे देयक सदर झालेल्या शेतकऱ्यांचे चुकारे लवकरात लवकर होणार असल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या एका अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!