विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठापना समारोह २२ जानेवारी २०२४ ला आयोजित केले असून यानिमित्त प्रत्येक नागरिकांनी आपआपल्या गावातील व मोहल्ल्यातील प्रत्येक मंदिरात सार्वजनिक उत्सव साजरा करून सामूहिक महाआरती करावी, असे आवाहन आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालयात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व दुर्गा वाहिनी शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना समारोहाच्या निमित्ताने पूजित अक्षता कलश अयोध्येवरून नागपूर- गडचिरोली ते वडसा येथील श्री दुर्गा माता मंदिरात येऊन पोहोचले असून आता तालुक्यातील सर्व गावांतील प्रत्येक मंदिरात पोहोचविण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. सदर अक्षता कलश वितरण कार्यक्रम २७ डिसेंबरला दुपारी २ वाजता असून घरोघरी अक्षता वितरण कार्यक्रम १ ते १५ जानेवारी २०२४ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी स्वयंसेवक प्रत्येक घरी जाऊन अक्षता देऊन अयोध्या येथील श्रीराम मंदिर वास्तूचे चित्र प्रवेशद्वारावर लावणार आहेत. या काळात मंदिर सजवून तोरण लावणे, रांगोळी काढणे व लाईटींग करण्याचे नियोजन आहे. आपल्या घरासोबतच दुकानाची सुद्धा दिवाळीप्रमाणे भगवी पताका लावून उत्सव साजरा केला जाणार आहे. यात शेतकरी, कर्मचारी, व्यापारी, आबाल वृद्ध, माता-भगिनी, बालक व युवकांनी सहभागी व्हावे. १२ जानेवारीला गावात रामधून, रामभजन व रामकथेचे आयोजन करून श्रीरामाचा १०८ वेळा सामूहिक जप करावा. तसेच मोठ्या पडद्यावर अयोध्या येथील कार्यक्रमाचे प्रक्षेपण करावे, असे नियोजन करण्यात आले आहे.







