विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने सेवेत समायोजन करण्याच्या मागणीसाठी संप व आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्याचे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी भेट देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
कोरोना महामारीत आपल्या कुटुंबाची परवा न करता देवदूतासारखे कोविड महामारीवर मात करण्यासाठी रात्रंदिवस आरोग्य सेवा देऊन सुद्धा महाराष्ट्र शासन या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यास असमर्थ ठरत आहे. परिणामी या सर्वच कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ठप्प झालेली आहे. एकीकडे सामान्य रुग्णांचे हाल होत आहे आणि आरोग्य सेवा पूर्णतः विष्कळीत झाली आहे. हे सरकार मात्र यांचे कडे दुर्लक्ष करत आहे. शासनाने व आरोग्य अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य करून त्यांना सेवेत समायोजन करावे, अशी मागणी डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी केली आहे.