– वनविभागाच्या अनास्थेनेच जंगली हत्तींचा हैदोस
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : यावर्षी जिल्ह्यात कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा आदी तालुक्यात जंगली हत्तींचे बस्तान होते. यावर वनविभाग लक्ष ठेवून होते. वडसा वनविभागाने या हत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर ‘हुल्ला चमू’ तयार केली होती. ही बाब निश्चित योग्य होती. मात्र, मागील काही दिवसांपासून गडचिरोली तालुक्यात हत्तींनी बस्तान मांडल्यानंतर ही ‘हुल्ला चमू’ गेली कुठे? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. ज्या परिसरातील शेतकऱ्यांचे हत्तींनी नुकसान केले आहे, तेथील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विश्वजीत कोवासे यांनी केली आहे.
जिल्ह्याच्या पूर्व टोकावर असलेल्या धानोरा तालुक्यातही हत्तींनी हैदोस घातला होता. यावर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने प्रयत्न केले. तरीही अनेक ठिकाणी हत्तींनी नुकसान केली आहे. सुरुवातीला वनविभागाकडून हत्तींनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे सातत्याने केले जात असल्याचे सांगितले जात होते. ही बाब खरी असली तरी ऑनलाइन तक्रारीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. पिकाचे नुकसान झाल्यानंतर २४ तासात तक्रार करावी, असे शासकीय धोरण आहे. मात्र, पिकाची नुकसान झाल्यानंतर तक्रार करायची की, शेतात असलेल्या पिकाचे संगोपन करायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे म्हणणे लक्षात घेऊन शासनाने या अटीत शिथिलता करावी, अशी मागणीही विश्वजीत कोवासे यांनी केली आहे.
सध्या दिवाळीच्या सुट्या असल्यामुळे अनेक कर्मचारी सुट्यांवर असल्याचे चित्र दिसून येते. सुट्टी ही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हक्काची बाब आहे. हे खरे असले तरी जबाबदारी व कर्तव्यही तितकेच महत्वाचे असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आपत्ती ओढावू नये, याकरिता उपाययोजना करणेही संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे. असे असतानाही शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यानंतरही अधिकारी व कर्मचारी वेळेत पोहचत नसल्याने शेतकऱ्यांनी दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्नही विश्वजीत कोवासे यांनी उपस्थित केला आहे.
शेतातील झोपडीचेही नुकसान
मौशिखांब येथील शेतकऱ्यांनी पिकाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने शेतशिवारात उभारलेल्या झोपडीचेही जंगली हत्तीनी नुकसान केले आहे. या झोपडीवर असलेल्या कवेलूचा जंगली हत्तीनी चुराडा केला आहे. यामुळे सदर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वनविभागाने शेतकऱ्यांच्या पिकासह उद्धवस्त झालेल्या झोपडीचीही नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मौशिखांब येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.







