– जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांची मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अहेरी तालुका मुख्यालयापासून अगदी कमी अंतरावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा येथील बसफेरी कोरोना काळापासून बंद असल्याने या भागातील नागरिकांना अहेरी उपविभागाला ये-जा करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. अहेरी ते रेगुंठा बसफेरी बंद असल्यामुळे या परिसरातील जवळपास पंधरा गावांमधील प्रवाश्यांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अहेरी आगाराने अहेरी ते रेगुंठा बसफेरी पूर्ववत सुरू करण्याची मागणी जि. प. माजी अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी केली आहे.
रेगुंठासह परिसरातील जवळपास पंधरा गावांमधील शेतकरी, शालेय विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक हे नेहमी विविध कामांसाठी अहेरी ला येत असतात. रेगुंठा परिसराला अहेरी उपविभाग हे अत्यंत जवळ असल्यामुळे येथील नागरिक रोज कोणत्या ना कोणत्या कामानिमित्ताने अहेरीला ये-जा करीत असतात. परंतु अहेरी ते रेगुंठा बस सेवा बंद असल्याने या परिसरातील प्रवाश्यांना जीव धोक्यात घालून नाईलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यामुळे नागरिकांना शारीरिक, मानसिक त्रासासोबत आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. कोरोनाच्या आधी रेगुंठा परिसरातील गावांसाठी अहेरी आगारातून सिरोंचा ते रेगुंठा आणि गडचिरोलीवरून रेगुंठासाठी बससेवा सुरू होती. मात्र कोरोना काळापासून ही बससेवा बंद करण्यात आली होती. अद्यापही ही बससेवा अहेरी व गडचिरोली आगाराकडून बंदच आहेत.
अहेरी आगाराकडून अहेरी ते रेगुंठा बसफेरी बंद असल्याने प्रवाश्यांना परिणामी खासगी वाहनांच्या टपावर बसून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. रेगुंठा परिसरातील नागरिकांची बसेफेरीची ही समस्या सोडवणुकीसाठी जि. प. माजी अध्यक्ष व अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी अहेरीचे एसटी आगाराकडून अहेरी ते रेगुंठापर्यंत बसफेरी पूर्वव्रत सुरु करण्याची मागणी केली आहे.