– मेंढपाळांच्या वतीने आमदार डॉ. देवरावजी होळी यांना निवेदन
– मेंढ्या, बकऱ्या चारण्यासाठी मेंढपाळांना चराईक्षेत्र देण्याची केली मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : वनविभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक मेंढपाळांना त्रास देत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे येत असून अकारण मेंढी बकरी चराई करणाऱ्या लोकांना त्रास देणे योग्य नाही. त्यामुळे अशा अकारण त्रास देणाऱ्या वनरक्षक, वनपाल व संबंधित वन अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली आहे. रामाळा व सगणापूर परिसरातील मेंढपाळ यांनी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची भेट घेऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत तक्रारीचे निवेदन केले व न्याय मिळवून देण्याची मागणी केली. याप्रसंगी मेंढपाळांच्या वतीने जागेश त्रिरगवार, वीरा अकलवार, सोमा उमलवार यांनी आमदार महोदयांना निवेदन दिले.
मेंढपाळ लोकांना चराईसाठी निश्चित क्षेत्र नसल्याने आपल्या मेंढ्या बकऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बसवतात. यादरम्यान ये – जा करताना जंगली भागातून रस्ता आल्यास त्यातून वा मुख्य रस्त्यावरून देखील मेंढी जाऊ देण्यास वनविभागाचे अधिकारी अडवणूक करतात ही बाब योग्य नाही. त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी अकारण मेंढपाळांना त्रास देऊ नये अन्यथा अशा अधिकाऱ्यांना योग्य धडा शिकवला जाईल, असा इशाराही त्यांनी या माध्यमातून दिला आहे.






