दहीहंडी उत्सवात पहिल्यांदाच युवतींनी घेतला सहभाग

19

– सांस्कृतिक कार्यक्रमासह दहीहंडी उत्सव साजरा

– माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचा पुढाकार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ८ सप्टेंबर : सिरोंचा तालुका मुख्यालयातील तहसील कार्यालय परिसरात माजी जि. प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सांस्कृतिक व दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुखस्थानी येथील तहसीलदार नितेंद्र शिकतोडे, ठाणेदार कुमारसिंग राठोड, नगरसेवक नागेश्वर गागापूरवार, माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते रवी रालाबंडीवार, नगरसेवक जगदीश रालाबंडीवार, सतीश भोगे, सतीश राचर्लावार, राकॉचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, गणेश बोधनवार, नगरसेविका नुसरत बाबर शेख, रवी सुलतान, फिरोज खान आदी उपस्थित होते.

बालगोपाल मटकी फोड मंडळ सिरोंचातर्फे आयोजित सांस्कृतिक तथा दहीहंडी कार्यक्रमासाठी माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्याकडून प्रथम पारितोषिक 31 हजार तर द्वितीय पारितोषिक 11 हजार रुपये देण्यात आले होते. या कार्यक्रमात एकूण 8 गोविंदा पथक सहभाग झाले होते. विशेष म्हणजे पहिल्यांदाच गोविंदा पथकात युवतींनी सहभाग घेतल्याने या ठिकाणी आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यात जिल्हा परिषद हायस्कुल सिरोंचा संघाने प्रथम पारितोषिक पटकाविले तर वाल्मिकी संघाने दुसरा पारितोषिक पटकाविले. युवतींची एकच संघ सहभाग झाल्याने त्यांना विजेतेपद देण्यात आले. तालुक्यातील विविध गावातून बाल गोपालांच्या वेशभूषेत संस्कृतीक कार्यक्रमात सहभाग झालेल्या बालगोपालांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.

एकंदरीत सिरोंचा तालुका मुख्यालयात मोठ्या उत्साहाने सांस्कृतिक तथा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला असून मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. भाग्याश्रीताई आत्राम यांनी गोविंदा पथकात पहिल्यांदाच सहभाग झालेल्या युवतींना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा उत्साह वाढविला हे विशेष.