ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी महत्वाकांक्षी व्हावे : पीएसआय पवार

59

– कारवाफा आश्रमशाळेत प्रेरणादायी मार्गदर्शन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : विद्यार्थ्यांनी आपला शैक्षणिक पाया मजबूत करावा.मोठे यश सहजासहजी कधीच मिळत नाही. स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्याला समर्पण करावे लागते. विद्यार्थ्यांनी मनामध्ये एक निश्चित असे ध्येय ठरवावे. ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी अंतकरणातून प्रयत्न करावे व महत्वाकांक्षी व्हावे, असे प्रतिपादन कारवाफा पोलीस मदत केंद्राचे पीएसआय प्रल्हाद पवार यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कारवाफा येथे शनिवार, २६ ऑगस्ट रोजी आयोजित प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रांमध्ये खूप मोठी संधी उपलब्ध आहे. ती वाया घालवू नका.एमपीएससी, युपीएससी, स्पर्धा परीक्षा, नोकरी, व्यवसाय, उद्योग, शेती या क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करा. खाच खळग्यातून मार्ग काढून सांभाळण्याजोगे स्वतःला सक्षम बनवा.निर्व्यसनी व चारित्र्यसंपन्न रहा.आपण गरीबाची लेकरे आहात. त्यामुळे हरवायला आपल्याजवळ काहीही नाही. पण आपल्या कर्तुत्वाने आपण जग जिंकू शकतो, असा दृढविश्वास निर्माण करा.अडचणीचा सामना करताना शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या. आजच्या डिजिटल युगात मोबाईलचा गैरवापर सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी यापासून सावध राहावे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजय देवतळे होते. प्रमुख अतिथी म्हणून उच्च माध्यमिक शिक्षक एम. ई. ठाकूर, टी. ए. आस्कर, प्राथमिक शिक्षक झेड.एच. फाये, रविकांत पिपरे उपस्थित होते. पीएसआय प्रल्हाद पवार यांचे स्थानांतरण कारवाफा येथून नाशिक येथे झाल्यामुळे कार्यक्रमाचे औचित्य साधून याप्रसंगी शाळेच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले. प्राथमिक शिक्षक व्ही. एम.नैताम यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उच्च माध्यमिक शिक्षिका पद्मावती महेशगौरी, पदवीधर प्राथमिक शिक्षिका चंदा कोरचा, प्राथमिक शिक्षक व्ही. एम. बनगिनवार, क्रीडा शिक्षक अभय कांबळे, सुनिता दुर्कीवार, करिष्मा गोवर्धन, सांगात संस्थेच्या सपना मेडपल्लीवार, वैभवी देव्हारे, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.