रेड्डी गोडाऊन – विवेकानंदनगर रस्त्याची दयनीय अवस्था

47

* मुरूम टाकून खड्डे बुजविण्याची कॉंग्रेसचे राकेश रत्नावार यांची मागणी

* ये – जा करताना नागरिकांना सहन करावा लागतो प्रचंड त्रास

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ३ ऑगस्ट : गडचिरोली शहरातील रेड्डी गोडाऊन ते विवेकानंदनगर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तरीदेखील नगर परिषदेने अजूनपर्यंत या रस्त्यावर मुरूम टाकले नाही. सदर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असल्याने नागरिकांना ये – जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याकडे आतातरी नगर परिषद प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर खड्ड्यात मुरूम टाकून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे गडचिरोली शहर उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी केली आहे.

शहरातील रेड्डी गोडाऊन ते स्वामी विवेकानंद नगर रस्त्याची पावसाळ्यामुळे दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून नागरिकांना ये – जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे नगरपरिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. विवेकानंद नगरातून जाणारा हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावर अजय उरकुडे कॉन्व्हेट स्कूल आहे. या रस्त्याने लहान मुलांना शाळेत जाताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. कारण मोठेमोठे खड्डे पडले असल्यामुळे टू व्हीलर, फोर व्हीलर जाताना अनेकांच्या अंगावर पाणी व चिखल उधळते. त्यामुळे शाळेतील मुलांना सुद्धा त्या रस्त्याने जाताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी या रस्त्याची सध्या अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देऊन या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करण्यात यावा, अशीही मागणी रत्नावार यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

मागील पाच वर्षांपासून रेड्डी गोडाऊन – विवेकानंदनगर ते साई मंदिर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. परिणामी या रस्त्याने आवागमन करताना शाळकरी मुले व नागरिकांना प्रचंड तास सहन करावा लागत आहे. याकडे नगर परिषद प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी आणि जनतेला या त्रासापासून मुक्त करावे, अशीही मागणी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी केली आहे.