– पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : लगान ते आलापल्लीपर्यंतच्या खराब रस्त्यामुळे या मार्गावरील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाची बससेवा मिळत नसल्याची ओरड मागील काही दिवसांपासून सुरू होती. त्यावर लॅायड्स मेटल्स कंपनीने पर्याय शोधत कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूल बस सुरू करण्यात आली आहे. या बससेवेचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे शाळकरी मुलांनी व पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
लॅायड्स मेटल्सच्या अॅन्ड एनर्जी लि. कंपनीकडून लगाम येथे या बससेवेचा शुभारंभ करताना कंपनीचे अधिकारी विनोद कुमार, भाजपचे संघटन महामंत्री रविंद्र ओल्लालवार, लगामचे सरपंच दीपक आत्राम, बोरीचे सरपंच मधुकर वेलादी, डॉ. चरणजितसिंग सलुजा, लिंगाजी दुर्गे, सुरेश गंगाधरीवार, ऋषी पोरतेत, गोविंद बिश्वास आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
लॅायड्स मेटल्सच्या लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्ता खराब झाल्याचे सांगत विद्यार्थ्यांसाठी एसटी बसेस वेळेवर चालविण्यास एसटी महामंडळाने असमर्थता दर्शविली होती. त्यावर कंपनीने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवून देण्यासाठी आणि घेऊन येण्यासाठी बसफेऱ्या सुरू करण्याचे ठरविले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचणे शक्य होत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. ही बस लगाम ते आलापल्ली मार्गावरील बोरी, लगाम, खमनचेरू, सुभाषनगर, महागाव, कनेपल्ली, आपापल्ली अशा सर्व गावातील विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवून देणार आहे. त्यामुळे या परिसरातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.