७ ऑगस्टला तिरुपती येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आठवे राष्ट्रीय महाअधिवेशन

93

– गडचिरोली जिल्ह्यातून ३०० प्रतिनिधी अधिवेशनासाठी राहणार उपस्थित

– १०० ओबीसी कार्यकर्ते गडचिरोलीवरून तिरुपतीसाठी रवाना

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ३१ जुलै : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आठवे राष्ट्रीय महाअधिवेशन महती आडीटोरियम बालाजी कॉलनी तिरुपती (आंध्र प्रदेश) येथे सोमवार, 7 ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे. या महाअधिवेशनाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री मा. ना. वाय. एस. जगनमोहन रेड्डी करणार आहेत.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराज अहिर, आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री मा. श्री. नारायण स्वामी, आंध्र प्रदेशचे मागासवर्गीय कल्याण मंत्री मा. श्री. चेलू बोईना वेणू गोपाल कृष्णा, तेलंगणाचे मागासवर्गीय कल्याण मंत्री श्री. गणगोला कमलाकर, आंध्र प्रदेशच्या महिला व बालकल्याण मंत्री मा. श्रीमती के. व्ही. उषाश्री, तेलंगणाचे खासदार व AIMIM चे अध्यक्ष मा. असदुद्दीन ओवेसी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री परिणय फुके, माजी मंत्री महादेवराव जानकर, आमदार एड. अभिजीत वंजारी, आमदार सुधाकरराव अडबाले, माजी आमदार डॉ. अविनाश वारजुरकर उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनामागील भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे मांडणार असून, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती व्ही. ईश्वरय्या बिज भाषण करणार आहेत. डॉ. अशोक जीवतोडे कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. दुपारच्या सत्राचे अध्यक्षपद तेलंगणा व आंध्र प्रदेश डीसीएल वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. राजूला श्रीनिवास गौड राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मा. वीरेंद्र सिंग यादव माजी न्यायमूर्ती अलाहाबाद हायकोर्ट, तेलंगणाचे खासदार वडी राजू रविचंद्र, खासदार गोपी देवी वेंकटरमन्नाराव, खासदार नबाकुमार सराबीया, सिने अभिनेता सुमन तलवार, माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे नातू इंद्रजीतसिंग उपस्थित राहणार आहेत.

या अधिवेशनात ओबीसींची जातनिहाय जनगणना या प्रमुख मागणीसह ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत २७ % किंवा देशातील ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लागू करणे, स्वतंत्र केंद्रीय ओबीसी मंत्रालयाची स्थापना करणे, सर्व शासकीय व निमशासकीय संस्थांना जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करणे, माननीय सर्वोच्च न्यायालयाने घातलेली 50 टक्के आरक्षणाची मर्यादा दूर करण्यासाठी घटना दुरुस्ती करणे, क्रिमिलेयरची असंविधानिक अट रद्द करणे, ओबीसी समाजातील शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे देण्यासाठी तीन पिढ्याची अट रद्द करणे, ओबीसी मुला मुलींना प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृह व स्वाधार योजना सुरू करणे यासह 42 मागण्यांच्या संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.

या अधिवेशनाला गडचिरोली जिल्ह्यातून ३०० ओबीसी प्रतिनिधी हजर राहणार आहेत. यापैकी १०० ओबीसी कार्यकर्त्यांची पहिली फळी ३० जुलै रोजी गडचिरोलीवरून तिरुपतीसाठी रवाना झाली. २०० ओबीसी कार्यकर्ते ५ ऑगस्टला रवाना होणार आहेत. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील विविध तालुक्यातून ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने महा अधिवेशनाला हजर राहावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, कार्याध्यक्ष विनायक बांदुरकर, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, सचिव प्रा. देवानंद कामडी, संघटक सुरेश भांडेकर, चंद्रकांत शिवणकर, शंकर चौधरी, युवा उपाध्यक्ष राहुल भांडेकर, महिला जिल्हाअध्यक्ष संगीता नवघडे, गडचिरोली शहराध्यक्ष सोनाली पुण्यपवार, महिला संघटक सुधा चौधरी, ज्योती भोयर, मंगला कारेकर, पुष्पा धंदरे, विद्या म्हशाखेत्री, दादाजी चापले, अड. संजय ठाकरे, प्राचार्य जयंत येलमुले, मुकुंदा म्हशाखेत्री, जगदीश लडके, विजय गिरसावळे, राजेंद्र उरकुडे, पांडुरंग नागापुरे, किरण कारेकर, कमलाकर रडके, रामकृष्ण ताजने, शालिकराम डोंगे, रमेश पत्रे, मुखरू आभारे आदींनी केले आहे.