पाण्यातून जाण्याचे धाडस करून जीव धोक्यात घालू नका : अजय कंकडालवार

67

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यातच गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे वैनगंगा आणि तिच्या उपनद्यांना पूर आलेला आहे. नदी-नाल्यांचे पाणी रस्त्यावरून वाहात असल्याने अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे. अशा स्थितीत पुराच्या पाण्यातून पलिकडे जाणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे कोणीही पुराच्या पाण्यातून आपले वाहन टाकण्याचा किंवा पैदल जाऊन पैलतीर गाठण्याचा प्रयत्न करू नये, असे कळकळीचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले आहे.

पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका दक्षिण भागातील अहेरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, सिरोंचा तालुक्यातील गावांना बसला आहे. जंगलातून वाहात येणाऱ्या नाल्यांवर अनेक ठिकाणी उंच पूल नसल्यामुळे पुराचे पाणी रस्त्यावरून किंवा रपट्यावरून वाहात आहे. आपण पलिकडे जाऊ शकतो असा अतिआत्मविश्वास कोणीही दाखवू नये. पाण्याला जास्त प्रवास असतो. शिवाय खाली चिखल साचलेला असतो. त्यामुळे पाय किंवा वाहन घसरून वाहात जाण्याची दाट शक्यता असते. आपला जीव आपल्या कुटुंबियांसाठी महत्वाचा असतो याची भान ठेवून नसते धाडस कोणीही करू नये, असे आवाहन आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि. प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी सर्व पूरग्रस्त नागरिकांना केले आहे.