गडचिरोलीत मुसळधार पाऊस, १६ मार्ग बंद

62

– वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

– दिना प्रकल्प हाऊसफुल्ल

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १८ जुलै : गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे तसेच गोसीखुर्द व इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या नद्यांची पाणीपातळी वाढलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातील प्रमुख १६ मार्ग बंद झाले आहेत. परिणामी अनेक गावांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. या पूरपरिस्थितीत नदी काठावरील गावातील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी व नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 21 गेट 0.50 मी. ने उघडलेले असून 2,428 क्युमेक्स (85,745 क्युसेक्स) विसर्ग सुरू आहे. चिचडोह बॅरेजचे 38 पैकी 38 गेट उघडलेले असून विसर्ग 7,866 क्युमेक्स (2,77,788 क्युसेक्स) आहे. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 31 गेट बंद असून विसर्ग निरंक आहे. दिना प्रकल्प 100 टक्के भरलेला असून सांडव्यावरुन 60 सेंमीने विसर्ग सुरू असल्याने प्राणहिता नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 35 गेट उघडलेले असून विसर्ग 5,727 क्युमेक्स (2,02,240 क्युसेक्स) आहे. या बॅरेजची पाणी पातळी 98.00 मी. असून पूर्ण संचय पातळीच्या 2.00 मी. ने खाली आहे.

अतिवृष्टी व धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आज दुपारपासून जिल्ह्यातील प्रमुख १६ मार्ग बंद झाले आहेत. यामध्ये चातगाव -कारवाफा- पोटेगाव- पावीमुरांडा- घोट रस्ता राज्यमार्ग (पोहार नदी, पोटेगाव जवळ लोकल नाला, देवापूर जवळील नाला) बंद असून पोटेगाव- राजोली मार्ग बंद (गडचिरोली), चापलवाडा ते चक चापलवाडा (चामोर्शी), चापलवाडा ते पोतेपली पॅच (चामोर्शी), चापलवाडा ते मक्केपल्ली मार्ग नाल्यावरील पुरामुळे बंद (चामोर्शी),  कुनघाडा- गिलगाव पोटेगाव रस्ता (पोटेगाव जवळ), तळोधी- आमगाव -एटापल्ली परसलगोंदी- गट्टा रस्ता राज्यमार्ग (पोहार नदी), तळोधी – आमगाव – एटापल्ली – परसलगोंदी – गट्टा  रस्ता (बांडीया नदी), अहेरी – आलापल्ली – मुलचेरा रस्ता (गोमणी नाला), अहेरी – आलापल्ली – मुलचेरा घोट रस्ता (कोपरअली जवळील नाला), अहेरी- मोयाबीनपेठा- वटरा रस्ता राज्यमार्ग (वटरा नाला), आलापल्ली- ताडगाव -भामरागड राष्ट्रीय महामार्ग (पर्लकोटा नदी), आलापल्ली -ताडगाव – भामरागड – लाहेरी राष्ट्रीय महामार्ग (गुंडेनुर नाला) व  (बिनागुंडा नाला), कसनसूर -एटापल्ली -आलापल्ली रस्ता राज्यमार्ग (करमपल्ली जवळील नाला, येलचिल जवळील नाला), कसनसूर – एटापल्ली – आलापल्ली रस्ता (एटापल्ली जवळील नाला), आष्टी – गोंडपिपरी- चंद्रपूर (जड वाहतुकीसाठी बंद) हे मार्ग बंद आहेत.

तालुकानिहाय पावसाची स्थिती

मागील २४ तासात जिल्ह्यात ७२६.३ मिमी पावसाची नोंद झाली असून याची सरासरी ६०.५ एवढी आहे. सर्वाधिक मुलचेरा तालुक्यात ११७.२ मिमी पाऊस पडला तर सर्वात कमी देसाईगंज तालुक्यात 28.5 मिमी पाऊस पडला आहे. गडचिरोली तालुक्यात 53.8 मिमी पाऊस पडला असून कुरखेडा 68.3, आरमोरी 40.5, चामोर्शी 40.7, सिरोंचा 29.4, अहेरी 58.8, एटापल्ली 95.1, धानोरा 77.6, कोरची 69.8 तर भामरागड तालुक्यात 46.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच १६ ठिकाणी अतिवृष्टी झाली असून यामध्ये धानोरा (ता. धानोरा) 100.2 मिमी, बेडगाव (ता. कोरची) 86.2 मिमी, पुराडा (ता. कुरखेडा) 85.4 मिमी, गट्टा (ता. एटापल्ली) 82.8 मिमी, घोट (ता. चामोर्शी) 80.0 मिमी, गडचिरोली (ता. गडचिरोली) 79.4 मिमी, आलापल्ली (ता. अहेरी) 77.8 मिमी, मुरूमगाव (ता. धानोरा) 72.2 मिमी, पेंढरी (ता. धानोरा) 71.6 कोरची (ता. कोरची) 70.4 मिमी, कुरखेडा (ता. कुरखेडा) 69.0 मिमी, कसनसूर (ता. एटापल्ली) 68.8 मिमी, चातगाव (ता. धानोरा) 66.2 मिमी, पेरमिली (ता. अहेरी) 65.4 मिमी, एटापल्ली (ता. एटापल्ली) 180.2 मिमी, मुलचेरा (ता. मुलचेरा) 117.2 मिमी यांचा समावेश आहे.