अहेरी येथे सुरू होणार जिल्हा व सत्र न्यायालय

54

– तत्कालीन पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने प्रश्न निकाली

– अहेरी अधिवक्ता महासंघाच्या लढ्याला अखेर यश

– अहेरी येथे २२ जुलैला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १६ जुलै : गडचिरोली जिल्हा न्यायालयात जाणे हे अहेरी, भामरागड , एटापल्ली, मुलचेरा तसेच सिरोंचा तालुक्यातील अंकीसा, आसरअली या दुर्गम भागातील जनतेला मोठे त्रासदायक होते. गडचिरोली ऐवजी अहेरीला जिल्हा व सत्र न्यायालय असणे सर्वांच्या सोयीचे होते. कित्येक वर्षांपासून त्यासंदर्भात मागणी होती. तत्कालीन पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने हा प्रश्न निकाली लागल्याने अहेरी अधिवक्ता महासंघाच्या लढ्याला अखेर यश आले असून अहेरी येथे येत्या, २२ जुलै रोजी सदर न्यायालयाचे उद्घाटन होणार आहे.

तब्बल एका तपापासून अहेरी तालुका अधिवक्ता महासंघाचा यासाठी संघर्ष सुरु होता. फाईल मंत्रालयात रखडलेली होती. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना तत्कालीन पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी अधिवक्ता महासंघाच्या सदस्यांना मुंबईला पाचारण करुन प्रक्रीयेला वेग आणला व ना. देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ मंजुरीही दिली होती. परंतु नंतर महाविकास आघाडी सरकार आल्याने सदर काम रखडले होते. परंतु पुन्हा सरकार बदलले व मागील अधिवेशनात राजे साहेबांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तत्परतेमुळे ऊर्वरित सोपस्कार पार पडले होते. अहेरी येथे जिल्हा व सत्र न्यायालयाला मंजुरी देण्यात आली. आज ते स्वप्न पुर्णत्वास येताना सर्वत्र आनंद व्यक्त केल्या जात आहे.
येत्या, २२ तारखेला सदर न्यायालयाचे उद्घाटन संपन्न होणार आहे. या सोहळ्याला उद्घाटक म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. भुषण रा. गवई तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. अतुल श. चांदुरकर, श्री. महेंद्र वा. चांदवाणी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री. उदय बा. शुक्ल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गेल्या अनेक वर्षांची जनेतची मागणी पूर्ण झाल्याने जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.