भाजप महिला मोर्चातर्फे भरड धान्याचे उत्पादन घेणाऱ्या इंदिरानगरातील शेतकरी महिलांचा सन्मान

49

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर भरड धान्य वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे. भारतीय संस्कृतीत आरोग्याच्या दृष्टीने भरडधान्य अर्थात श्रीअन्न अत्यंत महत्त्वाचे आहे. याचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्राने हा उपक्रम सुरू केलेला असून भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनिता अक्का, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे तथा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली 5 जुलै ते 25 जुलै 2023 पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे.

याच अभियानाअंतर्गत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली शहरातील इंदिरानगर वार्डातील भरड धान्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकरी महिलांना भाजप महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते शेतकरी महिला ललिताबाई नैताम, मायाबाई बुरे व नेवारे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, जिल्हा सचिव प्रतिभा चौधरी, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, माजी नगरसेविका लता लाटकर, नीता उंदिरवाडे, शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, शहर सचिव नीता बैस, अर्चना चन्नावार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी शेतकरी महिलांना मार्गदर्शन करताना जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे म्हणाल्या, महाराष्ट्रभर या भरड धान्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून ज्वारी, बाजरी, नाचणी, मका हे भरड धान्य महाराष्ट्रात ज्या भागात पिकवल्या जाते तिथल्या ग्रामिण भागातील महिला शेतकऱ्यांची भेट घेत त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. तसेच भरड धान्य शरीराला किती पौष्टिक आहे व भरड धान्ये, कडधान्ये गरोदर मातांना तसेच आपल्या मुलांना देणे गरजेचे आहे. त्याचे महत्त्व त्यांनी महिलांना समजावून सांगितले. या कार्यक्रमाअंतर्गत भरड धान्य निगडित गृहउद्योग करणाऱ्या स्वयंसिद्धा महिलांची भेट घेवून त्यांचा ही पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांनी सांगितले.