मोदी सरकारच्या अपयशाबद्दलची माहिती घरोघरी पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे : डॉ. नामदेव किरसान

29

– देलनवाडी येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक

विदर्भ क्रांती न्यूज

आरमोरी, २९ जून २०२३ : २७ जून २०२३ रोजी देलनवाडी (ता. आरमोरी) येथे श्री दिघेस्वरजी धाईत यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान यांनी मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळातील अपयशाबद्दलची माहिती देताना स्पष्ट केले की, मोदी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहेत. विदेशी बँकातून काळा धन आणण्याचे व प्रत्येकांच्या खात्यात 15 लाख जमा करण्याचे, भ्रष्टाचार संपविण्याचे, आतंकवाद संपविण्याचे, महागाई व बेरोजगारी कमी करण्याचे, चीनचे अतिक्रमण थांबविण्याचे, सन 2022 पर्यंत देशातील सर्व बेघरांना पक्के घर देण्याचे, सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पादनाला उत्पादन खर्चाच्या दीडपट किंमत देण्याचे व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे, गंगा स्वच्छ करण्याचे, 100 स्मार्ट सिटी बनविण्याचे, डिजिटल इंडिया बनविण्याचे, बुलेट ट्रेन चालविण्याचे, हवाई चप्पल वाल्यांना हवाई जहाजात बसविण्याचे, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वाढविण्याचे, रेल्वेचे खाजगीकरण न करण्याचे, देशात संहिष्णुता कायम ठेवण्याचे, पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे, डिझेल पेट्रोल गॅसचे दर कमी करण्याचे, लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्याचे, आत्मनिर्भर भारत चे, स्टार्टअप इंडियाचे व अशाप्रकारे दिलेली अनेक आश्वासने मोदी सरकारने मागील नऊ वर्षाच्या कार्यकाळात पूर्ण केलेली नाहीत. याउलट बेरोजगारी व महागाईमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. रेल्वेचे खाजगीकरण, काळा धन परत आला नाही व खात्यात 15 लाख जमा झाले नाही, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळाला नाही, देशातील प्रत्येक बेघराला घर मिळाले नाही, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली, आतंकवादमध्ये वाढ झाली, भ्रष्टाचार वाढला, देश आत्मनिर्भर झाला नाही अजूनही बऱ्याच वस्तूंसाठी चीनवर अवलंबून आहे, चीनने सीमेवर अतिक्रमण करून शहर बसवले, जाती धर्माच्या नावावर द्वेष पसरविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर या नववर्षाच्या काळात झाले, शेतकऱ्यांच्या आंदोलनात 700 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला, सार्वजनिक उपक्रमांची विक्री, कर्जबुडवेगिरी वाढली, पुंजीपतींचे कर्ज माफ करण्यात आले, जनसामान्यांवर जीएसटीच्या रूपाने कर लादून मूठभर पूजीपतींचे घर भरण्याचे काम सरकारने केले. हे त्यांचे अपयश लपविण्यासाठी मोदी सरकारच्या नववर्षाच्या कार्याची माहिती घराघरापर्यंत पोहोचण्याचे काम बीजेपीने सुरू केलेले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून मोदी सरकारचे अपयश व जाणसामान्य विरोधी धोरणांची माहिती घराघरापर्यंत पोहोचविण्याचे काम काँग्रेस कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन डॉ. किरसान यांनी केले.

बैठकीचे अध्यक्ष गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्रजी ब्राह्मणवाडे, प्रमुख अतिथी माजी आमदार आनंदरावजी गेडाम, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष वामनरावजी सावसाकडे, आरमोरी काँग्रेस तालुकाध्यक्ष मिलिंदजी खोब्रागडे, प्रा. डी. के. मेश्राम, हस्तक गुरुजी, चौधरी, दिघेश्वरजी धाईत, राहुलजी धाईत व मोठ्या संख्येने परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी व शुभचिंतक उपस्थित होते. यानंतर केक कापून श्री दिघेश्वरजी धाईत यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.