– तलाठी भरती प्रक्रियेत तत्काळ सुधारणा करून जिल्ह्यातील तरुणांना संधी देण्याची काँग्रेसची मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, 28 जून : महाराष्ट्र शासनाने नुकताच तलाठी आणि वणरक्षक भरतीची जाहिरात प्रकाशित केली. मात्र ही जाहिरात प्रकाशित करत असताना ओबीसी समाजाचा गवगवा करणाऱ्या भाजप सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाजावर अन्याय करत आदिवासी विरुद्ध गैरआदिवासी असा तेढ निर्माण करून जातीय राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
नुकत्याच प्रकाशित केलेल्या जाहिरातीत 158 पैकी फक्त 7 जागा गैरआदिवासीसाठी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्याने असलेल्या ओबीसी, अनुसूचित जाती, विमुक्त भटक्या जाती / जमाती आणि इतर समाजावर मोठा अन्याय आहे. इतकेच नाही तर आदिवासी समाजासाठी राखीव उर्वरित 151 जागाची भरती करीत असताना फक्त स्थानिकांच सरकारने जागा आरक्षित करायला हवे होते. मात्र असे न केल्याने अतिदुर्गम मागास जिल्ह्यातील आदिवासी युवक राज्यातील इतर आदिवासी युवकांशी कशी काय स्पर्धा करणार, असाही प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. त्यामुळे ह्या भरती प्रक्रियेत सुधारणा करून जिल्हातील जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्यात यावी, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे. अन्यथा मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशाराही महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिला आहे.