सरकारनं कर्ज काढावं पण शेतकऱ्यांच्या डोक्यावरील आर्थिक बोजा कमी करावा : शरद पवार

189

– देसाईगंज येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

गडचिरोली : राज्यातील आघाडी सरकारने दोन वर्ष धानाला बोनस दिला. मात्र यंदा सरकारची स्थिती वाईट आहे. जीएसटीचे केंद्राकडून २४ हजार कोटी रुपये राज्याला येणे बाकी आहे. त्याचा परिणाम राज्याच्या खजिन्यावर झाला आहे. तरीपण सरकारनं वेळप्रसंगी कर्ज काढावं पण शेतकऱ्यांच्या डोक्यावरील आर्थिक बोजा कमी करावा अशी आमची सरकारला विनंती असेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले. देसाईगंज येथे आज, १८ नोव्हेंबर रोजी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री खा. प्रफुल्ल पटेल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी खासदार मधुकर कुकडे, राजेंद्र जैन, सुबोध मोहिते, रमेश बंग, माजी आमदार हरिराम वरखडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा विद्यमान जि. प. सदस्या भाग्यश्री आत्राम (हलगेकर), राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शाहिन हकीम आदींची उपस्थिती होती. पुढे शरद पवार म्हणाले, राज्यात आदिवासीबहुल जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. या जिल्ह्यातील विकासाच्या अनेक प्रश्नांवर आपल्याला लक्ष द्यायचे आहे. या जिल्ह्यात जंगल व इतर संपदा मोठ्या प्रमाणात असून आदिवासी समाज हा जल, जंगल व जमीन यांचे संवर्धन करीत असल्याचे ते म्हणाले. शेती हा महत्त्वाचा धंदा आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा ८० टक्के लोक शेती करत होते. आज देशाची लोकसंख्या १०० कोटींंच्या पुढे गली व शेती करणाऱ्यांची संख्या ६० टक्के झाली. विकासासाठी जमीन वापरल्या गेल्याने साहजिकच शेतीसाठीची जमीन कमी होत गेली. म्हणून शेतकरी वर्गाला मदत करणारे धोरण आखले पाहिजे, असे पवार म्हणाले. आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जागरूक आहे. मात्र केंद्र सरकार त्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर नाही. गेले वर्षभर देशाच्या राजधानीत शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. परंतु केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका शरद पवार यांनी यावेळी केली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, श्रीनिवास गोडसेलवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपा नेते नाना नाकाडे यांच्यासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
या मेळाव्यात भाजपाचे जि. प. गटनेते नाना नाकाडे, कुरखेडा येथील राम लांजेवार, आरमोरीचे सुनील नंदनवार, प्रदीप हजारे, देसाईगंजचे संजय साळवे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी शरद पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा दुपट्टा देऊन त्यांचे स्वागत केले.