नैराश्येतूनच नक्षलवादाला खतपाणी : शरद पवार

146

गडचिरोली : विकासाच्या दृष्टीने गडचिरोली जिल्ह्याकडे लक्ष न दिल्याने लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली व त्याचा फायदा नक्षल चळवळीने घेतला. आजच्या घडीला या जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला काम नसल्याने नैराश्या पसरली आहे. या नैराश्येतूनच नक्षलवादाला खतपाणी मिळत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा. शरद पवार यांनी म्हटले आहे. देसाईगंज येथे १८ नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित केल्यानंतर गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नक्षलवाद हा केवळ कायदा व सुव्यवस्थेचा नाही तर सामाजिक व आर्थिक प्रश्न आहे. विकासापासून वंचित असलेल्या लोकांपर्यंत विकास कसा पोहचविता येईल याचा विचार झाला पाहिजे. विकासात अडथळा निर्माण करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले पाहिजे. आज गडचिरोलीत दळणवळणाची सुविधा निर्माण झाली आहे. पूर्वीच्या परिस्थितीत नक्कीच सुधारणा झाली असली तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नक्षलवाद हा केवळ गडचिरोली व शेजारच्या जिल्ह्यांचा विषय राहिलेला नाही. सरकारविरोधात आक्रोश निर्माण करण्याची परिस्थिती कशी तयार करता येईल याचे वेगळ्या पद्धतीने काम सुरू असल्याचे दिसून येत असल्याचेही शरद पवार यावेळी म्हणाले. याप्रसंंगी खा. शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, शेतकरी आंदोलन, राज्यातील हिंसाचार आदी विषयांवर पत्रकारांशी वार्तालाप केला. या पत्रपरिषदेला माजी केंद्रीय मंत्री खा. प्रफुल्ल पटेल, सुबोध मोहिते, आमदार धर्मरावबाबा आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांची उपस्थिती होती.