अवयवदानाने हजारो जीव वाचविता येतील : डॉ. घोरपडे

113

विदर्भ क्रांती न्यूज

गोंदिया : शरीर एक क्षणभंगुर आहे. मृत्यूनंतर अवयवदानाने ८ जणांचे जीव वाचविता येते. आपल्या देशात अवयव दानाअभावी हजारो लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागते. नागरिकांनी अवयव दान केले तर हे हजारो जीव वाचविता येतील. याकरिता आपल्या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत अवयव दान जनजागृती मोहीम पोहोचून जागृती झाली पाहिजे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदियाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी केले. नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात आयोजित अवयवदान जागृती कार्यक्रमात बोलत होते.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण व वैद्यकीय द्रव्ये विभागाच्या वतीने येत्या ७ एप्रिलपासून संपूर्ण राज्यभर अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया आणि गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जनजागृती कार्यक्रमाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. शारदा महाजन होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदियाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्रा. डॉ. अमित जोगदंड, प्रा. डॉ. राजेश कटरे, प्रा. डॉ. मोहित गजभिये, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. राकेश खंडेलवाल, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. अंबादास बाकरे उपस्थित होते. शिक्षणमहर्षि मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. महाजन म्हणाल्या, भारतीयांसाठी अवयवदान हे काही नवीन नाही. ही आपल्यासाठी प्राचीन परंपरा आहे. आपल्या देवी देवता यासाठी प्रेरणा देतात. आपल्या अवयव दानाने कुणी जिवंत राहत असेल तर यापेक्षा आनंदाची दुसरी बाब नाही. अवयव दान करणाऱ्यालाही मरणांती जिवंत राहता येते. त्यामुळे ही जनजागृती मोहीम तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे. आमच्या नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाने प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र मोहिमेत हिरहिरीने सहभाग नोंदविला. ही अवयवदान मोहीम यशस्वी करण्यासाठी आपण महाविद्यालयाच्या सर्वतोपरी सहकार्य करू, असे डॉ. शारदा महाजन यांनी सांगितले. प्रा. डॉ. अमित जोगदंड म्हणाले, दानाची प्राचीन परंपरा पुन्हा सक्रिय करणे हा या मागचा उद्देश आहे. डोळे, किडनी, हृदय, यकृत, हड्डी, त्वचा, स्वादुपिंड, आतडे, आणि फुफुसे हे आठ अवयव आपल्याला दान करता येतात. जो जिवंत आहे असा व्यक्ती, ज्याचे हृदय धडकणे बंद केले आहे अशी व्यक्ती आणि ज्याचा मेंदू मेलेला आहे. परंतु ह्रदय जिवंत आहे असा व्यक्ती अवयव दान करू शकतो, असे प्रा. डॉ. जोगदंड यांनी सांगितले. प्रा. डॉ. कटरे यांनी अवयवदान केल्यास आठ जणांचे जीवन वाचू शकते तर हजारो लोकांचे जीवन सुधारू शकते असे सांगितले. प्रा. डॉ. मोहित गजभिये यांनी राज्यात ५० लाख नेत्र रुग्ण असल्याचे सांगून नेत्र दान केल्यास दान कर्त्याला मरणांती जग पाहता येते. एका व्यक्तीच्या नेत्र दानाने चार ते पाच व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते. त्यामुळे नेत्रदान आणि अवयवदान ही जनजगृती मोहीम यशस्वी व्हावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन निखिल बनसोड या विद्यार्थ्याने केले. प्रास्ताविक डॉ. अंबादास बाकरे तर आभार डॉ. सरिता उदापूरकर यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अर्चना जैन, डॉ. रवींद्र मोहतुरे, प्रा. योगेश भोयर, डॉ. बबन मेश्राम, प्रा. घनशाम गेडेकर, प्रा. लोकेश कटरे, प्रा. अर्चना अंबुले, डॉ. नंदेश्वर यांनी सहकार्य केले.