– आमदार डॉ. देवरावजी होळी गरजले
– धानोरा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद
– खासदार अशोक नेते यांचीही यात्रेला उपस्थिती
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे जननायक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून वारंवार होत चाललेली बदनामी व अपमान जनक वक्तव्य कदापी सहन केले जाणार नाही, असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी धानोरा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव यात्रेच्या सभेच्या प्रसंगी उपस्थित जनतेला मार्गदर्शन करताना केले.
यावेळी मंचावर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, जिल्ह्याचे महामंत्री प्रशांतजी वाघरे, सचिव अनिल पोहनकर, तालुका अध्यक्ष शशिकांतजी साळवे, जिल्ह्याचे भाजपाचे नेते साईनाथजी साळवे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य लताताई पुंघाटी, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळूभाऊ उंदीरवाडे, नगरसेवक संजूभाऊ कुंडू युवा भाजपा नेते सारंग साळवे, विजय कुमरे, दिलीप गावडे यांच्यासह गावातील सावरकर भक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धानोरा सारख्या अतिदुर्गम मागास असलेल्या या ठिकाणी जनतेचा स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला मिळालेला प्रतिसाद हा विरोधकांना योग्य धडा शिकविणारा संदेश असल्याचे ते म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण आयुष्य आपल्या भारत भूमीसाठी समर्पित राहिलेले आहे जे त्यांच्या पायाची धूळ देखील होऊ शकत नाही ते त्यांच्यावर टीका करण्याचं साहस करीत आहेत. हा प्रकार म्हणजे सूर्यावर पाणी टाकून विझविण्याचा प्रकार आहे. परंतु सूर्याच्या प्रखर तेजापुढे हे कधीही टिकाव धरू शकणार नाही. मात्र तरीही असा अपमान जाणीव पूर्वक विरोधी लोकांकडून केला जात आहे. त्यामुळे यापुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा असा अपमान जनता सहन करणार नाही. असे वक्तव्य करणाऱ्यांना येणाऱ्या काळात जनताच योग्य धडा शिकवेल, असा विश्र्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.