आरोग्य विभागात सेविकांचे कार्य महत्त्वपूर्ण : माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम

31

– जागतिक महिलादिनी राकाँतर्फे आरोग्य सेविकांचा सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आरोग्य विभाग हा प्रत्येक नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून या विभागांतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले. 8 मार्च बुधवारला उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील आरोग्य सेविकांंचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्य्या जिल्हा उपाध्यक्ष सौ. आरती डुकरे, संध्या मुंगमोडे, मंगला गोबाडे, माया सुनतकर, शोभा मडावी, सुवर्णा सडमेक, निवेदिता विरगोनवार आदी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, इतरांसारखे आरोग्य सेविकांना सुद्धा आपला संसार असतानाही घरदार सोडून 24 तास त्या रुग्णसेवा करतात. एवढेच नव्हेतर कोरोना काळातही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करणाऱ्या या योद्धा साक्षात दुर्गा मातेचा अवतार आहेत. या कठीण काळात जनतेची सेवा करणाऱ्या या आरोग्यसेविकांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. देवळात फक्त देवीची मूर्ती बंदिस्त होती.पण आरोग्य सेविकांच्या रुपाने देव आपल्या भक्तांना मदत करीत होते. कोरोनामुळे संपूर्ण देश भयभीत झाला होता. अशावेळी सर्व नागरिक लॉकडाऊनमध्ये घरात बसले होते. परंतु आपल्या या भगिनी कोरोनाची सुरुवात झाली तेव्हापासून कोरोना बाधितांच्या घरी जाऊन त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या कुटुंबीयांना कोरोंटाईन, त्यांना योग्य सल्ला देणे समाजात जनजागृती करणे असे महान कार्य केले आहेत.त्यामुळे आरोग्य सेविकांचा आजच्या दिवशी सन्मान होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

महिला डॉक्टरांचाही शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान
उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथील अहोरात्र रुग्णांची सेवा करणारे महिला डॉक्टर तसेच आरोग्य सेविका दर्या राऊत, करिश्मा चिडे, कविता सडमेक, वंशीका वेलादी, कुमारी विनायक, संगीता टेकाम, ज्योत्स्ना जुनघरे, लक्ष्मी दुर्गे, कुंदा मुंगमाळे, रोहिणी आरेवार, रोशनी दुर्गे आदी आरोग्य सेविकांचा सन्मान करण्यात आला.