मोफत गणवेशासोबत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण हवे

70

– सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शिलू चिमुरकर यांची राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : सादर झालेल्या अर्थसंकल्पामधून वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यासह विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचीही घोषणा केली आहे. अर्थसंकल्पातील घोषणेनुसार पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या १ हजार रुयपांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करून ती ५००० हजार रुपये करण्यात आली आहे. तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या १ हजार ५०० रुपयांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करून ती ७ हजार ५०० रुपये एवढी करण्यात आली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार असल्याची घोषणाही अर्थसंकल्पामधून करण्यात आली आहे. हे करीत असतांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि शाळांतील पटसंख्या गळती थांबविण्यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शिलू चिमुरकर यांनी दिली.

महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत १.५ लाख रुपयांची मर्यादा आता ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वैद्यकीय उपचारांसाठी सर्वस्वीपणे सरकारी रुग्णालयांवर अवलंबून असणाऱ्या गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत २०० नवीन रुग्णालयांचा समावेश, स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने आणि गडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याने डॉ. शिलू चिमुरकर यांनी सरकारचे अभिनंदन केले.