नव्याने मतदार यादी तयार करावी

20

– रायुकाँँ विधानसभा अध्यक्ष रूपेश वलके यांची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक नगर परिषद हद्दी अंतर्गत वॉर्डनिहाय मतदारांची यादी नियमित केली. मागील अनेक वर्षांपासून तीच मतदार यादी जाहीर केली जात आहे. यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. या मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करीत प्रत्येकाला मतदानकार्ड वाटप करून नव्याने सर्व वॉर्डाचे सर्वेक्षण करून मतदार यादी तयार करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

रुपेश बलके यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नगर परिषदेअंतर्गत मागील अनेक वर्षांपासून जुनीच मतदार यादी सादर केली जात आहे. आजपर्यंतच्या यादीत वॉर्डात हजर नसलेले, लग्न झालेले, मयत झालेले वा नवीन अर्ज सादर करणाऱ्यांची नावे समाविष्ट नाहीत. शासनस्तरावरून नियुक्त केलेल्या बीएलओकडे याची जबाबदारी असताना त्यांनी आपले काम केले नसल्याचा आरोपही वलके यांनी केला आहे.

दर पाच वर्षांनी मतदार सर्वेक्षण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांंचा खर्च केला जातो. परंतु नगर परिषद हद्दीतील नागरिकांना अद्यापही निवडणूक मतदानकार्ड उपलब्ध झालेले नसल्याने या निधीचा उपयोग काय ? असाही प्रश्न वलके यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे वॉर्डावॉर्डात सर्वे करुन नवीन मतदार यादी तयार करण्यात यावी, अशीही मागणी रुपेश वलके यांनी पत्रकातून केली आहे.