पोलिसांप्रमाणेच विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) यांनाही शौर्य पदकासाठी नामांकित करा : आमदार डॉ. देवरावजी होळी

26

– अत्यंत तुटपुंज्या मानधनावर आपल्या जीवाची पर्वा न करता पोलिसांप्रमाणेच जिवाजी बाजी लावणाऱ्या एसपीओच्या मानधनात वाढ करण्याची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांच्या बारीक हालचालीवर नजर ठेवून आपल्या जीवाची परवा न करता पोलिसांसाठी विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) म्हणून काम करणाऱ्या तरुणांनाही त्यांनी केलेल्या शौर्यासाठी पोलिसांप्रमाणेच त्यांनाही शौर्यपदक देण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली आहे.

आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी नवेगाव कॉम्प्लेक्स परिसरातील नक्षलग्रस्त, आत्मसमर्पित नक्षल व नक्षलपीडितांच्या झोपडपट्टी वसाहतीमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांच्यासाठी तयार करण्यात येत असलेले निवास, त्यासंदर्भातील अडचणी यासाठी नुकतेच पोलीस प्रशासनाची आपण भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) म्हणून कार्यरत असलेल्यांची विशेष भेट घेतली. हे एस. पी. ओ. स्थानिक जिल्हयातील असून त्यांना येथील परिसराचा उत्तम असा अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाच्या माहितीच्या आधारावरच अनेकदा पोलिसांना मोठमोठ्या नक्षलविरोधी कारवाया करण्यात यश मिळालेले आहे. आपला जीव धोक्यात घालून, आपला मृत्यू निश्चित आहे हे लक्षात असूनही ते आपल्या जीवाची परवा न करता या अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत. ही एक मोठी देशसेवा आहे. त्यांच्या या शौर्याचा करावा तितका कौतुक कमी असून तेही शौर्य पदकासाठी पात्र आहेत. मात्र त्यांना अत्यंत कमी मानधन दिले जाते तेही मानधन अनेक महिने दिले जात नाही. त्यांच्या शौर्याची दखल घेण्याची नितांत आवश्यकता असून त्यांच्या मानधनात तातडीने वाढ करण्यात यावी व ज्याप्रमाणे पोलिसांना नक्षल कारवायांसाठी शौर्य पदक दिले जाते त्याचप्रमाणे या एसपींना देखील शौर्यपदक दिले जावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.