भोगणबोडी येथील निरुपयोगी बंधारे बांधणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई करा: आमदार डॉ. देवरावजी होळी

51

– स्वतः शेतात व बंधाऱ्यावर जाऊन केली बंधाऱ्याची पाहणी

– बंधाऱ्याच्या पाण्याचा शेतकऱ्यांना कोणताही लाभ होत नसल्याने बंधाऱ्यांचा फायदा काय असा केला सवाल?

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जलसंधारण विभागाच्या मार्फतीने करण्यात येत असलेल्या बंधार्‍यांच्या कामाची चौकशी होण्याची नितांत आवश्यकता असून भोगणबोडी येथील बांधण्यात आलेला बंधारा हा शेतकऱ्यांच्या शेतीला कोणताही लाभ देणारा नसल्याने या बंधाऱ्याचे बांधकामाचे नियोजन करणाऱ्या अभियंत्यावर व निकृष्ट बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी या बंधाऱ्याच्या पाहणीच्या प्रसंगी केले केली. यावेळी भाजपा चामोर्शी तालुक्याचे अध्यक्ष दिलीप चलाख, पुरुषोत्तमजी बोरकुटे, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये जलसंधारण विभागाच्या वतीने असंख्य बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. परंतु ही बंधाऱ्याची कामे करताना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न करता केवळ कंत्राटदारांना कमाई करून देण्यासाठी व त्यातून स्वतःला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी सदर बंधाऱ्यांचे बांधकाम केले असल्याचा आरोप आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी केला आहे. या बंधाऱ्याच्या निर्मितीनंतर या ठिकाणी करावयाची पाणी वाटप समिती देखभाल समितीची सुद्धा निश्चिती करण्यात आली नाही. त्यामुळे हे सर्व बंधारे निरुपयोगी पडलेले असून येथील बंधाऱ्याचा उपयोग एकाही शेतकऱ्याला होत नसल्याचा आरोप करीत या समित्यांची रचना करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. तसेच या संदर्भात दोषी असणाऱ्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचे ते म्हणाले.