सर्वांना सोबत घेऊन विकासात्मक कामे करा : योगिताताई पिपरे

51

– कोटगल ग्रा. पं च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गावाचा विकास हा ग्रामपंचायतीवर अवलंबून असतो. त्यामुळे गावात कोणती विकास कामे करायची आहे. त्याविषयी ग्रामपंचायत बॉडीने विचार विनिमय करून गावाचा विकास करण्यावर भर द्यावा व सर्व विकासकामे नियमाला अनुसरून करावे व नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर प्राधान्याने भर द्यावा. ज्या बाबीची आपल्याला माहिती नसेल ती बाब दुसऱ्याकडून जाणून घेऊन विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे व सर्वांना सोबत घेऊन विकासाची कामे करावी, असे प्रतिपादन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केले. ग्रामपंचायत कोटगल येथे आयोजित नवनियुक्त ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हा महामंत्री तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई चौधरी, ग्रामपंचायतच्या नवनियुक्त सरपंच ममता दुधबावरे, उपसरपंच तेजप्रभा भोयर, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ भोयर, उर्मिला भोयर रवींद्र फडके, रिता खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते मोहन ठाकरे, माजी उपसरपंच श्यामसुंदर बावणे, देविदास भोयर, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम बावणे व गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी नगरसेवक प्रमोद पिपरे म्हणाले, गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकमताने कार्य करावे, सदस्यांनी हेवेदावे न करता विकासात्मक गोष्टींवर चर्चा व विचार करून कार्य करावे. विरोधकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून विकासात्मक कामे करण्यावर भर द्यावा व न घाबरता आत्मविश्वासाने गावाचा विकासाकडे लक्ष द्यावे, असे यावेळी सांगितले. याप्रसंगी नवनियुक्त सरपंच ममता दुधबावरे, उपसरपंच तेजप्रभा भोयर व ग्राम पंचायत सदस्यांचा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे व भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.