वैचारिक बदल झाला तरच विकासाला गती मिळेल : आमदार भाई जयंत पाटील

54

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात विपूल प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती आहे. मात्र अद्यापही अपेक्षित विकास होऊ शकला नाही. वैचारिक बदल झाला तरच या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
भारतीय शेतकरी कामगार पक्ष जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने 26 व 27 नोव्हेंबर 2022 रोजी गडचिरोली येथे मध्यवर्ती समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आमदार भाई जयंत पाटील शुक्रवारी गडचिरोलीत आले असता सर्किट हाऊस कॉम्प्लेक्स येथे पत्रपरिषद घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

पारंपरिक व्यवसाय संपुष्टात न आणता नैसर्गिक संसाधनांवर आधारित विविध उद्योग उभारले गेले पाहिजेत. मात्र येथे उत्खनन व उद्योगाच्या नावावर पारंपरिक व्यवसाय नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी व कष्टकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. हा अन्याय दूर करून विकासाचे नियोजन शासन, प्रशासनाने केले पाहिजेत, असे ते म्हणाले.
या जिल्ह्यात राजकीय आरक्षण सर्वसमावेशक नाही. ओबीसी व एससी समाजावर आरक्षणाच्या बाबतीत अन्याय होत असल्याचे दिसत आहे. हा अन्याय दूर झाला पाहिजे. याकरिता आपण अधिवेशनात मा मुद्दा मांडणार आहे.
शेतकरी, कष्टकरी, मच्छीमार आदिवासींवरील अन्याय, आरक्षण, ओला दुष्काळ, महागाई, महिलांवरील अत्याचार असे 7 ते 8 ठराव मध्यवर्ती बैठकीत मांडणार असल्याचे आमदार भाई जयंत पाटील यांनी पत्रपरिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेत शेकापचे कार्यालयीन चिटणीस प्रा. एस. व्ही. जाधव, ज्येष्ठ नेते ऍड. राजेंद्र कोरडे, गडचिरोली जिल्हा चिटणीस रामदास जराते, महिला नेत्या जयश्री वेळदा, संजय दुधबळे, जिल्हा खजिनदार श्यामसुंदर उराडे, गुरवळा येथील सरपंच दर्शना भोपये, अनिता ठाकरे, अमोल मारकवार, तुकाराम गेडाम, अक्षय कोसनकर आदी उपस्थित होते.