विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील मानसेवा वैद्यकिय अधिकारी डॉ. विजय मडावी (वय ४२) हे आपले कर्तव्य बजावून मलमपोडूर येथून खडतर रस्त्याने येत असनाना त्यांंच्या दुचाकीला अपघात झाला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांंचे अपघाती निधन झाले. सदर अपघात 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडला.
डॉ. विजय मडावी हे लाहेरी परिसरातील माता सुरक्षित तर घर सुरक्षीत या अभियानाअंतर्गत व कोविड लसीकरण मोहीम राबवून शनिवारी पलमपोडूर येथून ड्युटी आटोपून परत येत असताना त्यांच्या दुचाकी वाहनाला अपघात घडला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान एक – दीड तास त्या रस्त्याने कुणीही गेले नसल्यामुळे त्यांना तातडीने मदत मिळू शकली नाही. बऱ्याच वेळानंतर काही लोकांनी डॉक्टरांंना पडलेल्या अवस्थेत बघून त्यांनी रुग्णवाहिनी बोलावून ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे भरती केले असता तेथील डॉक्टरांनी मृतक घोषित केले.
डॉ . विजय मडावी भामरागड परिसरात परिचयाचे होते. कारण त्या भागात त्यांनी ११ वर्षे सेवा दिली. मागील वर्षापासुन ते लाहेरी दवाखाण्यात कार्यरत होते. ते मनमिळावू स्वभावामुळे परिचित डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी (आरोग्य सेविका), 1 मुलगा, 1 मुलगी असा आप्त परिवार आहे.