विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : महिलांवरील अत्याचाराला पुरुषप्रधान व्यवस्था व मानसिकता जबाबदार असली तरी अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. यामुळे समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत जाते. कोणी आपल्यावर अत्याचार करत असेल तर लगेच मुलींनी, महिलांनी त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक विषमता व अन्यायकारक समाज व्यवस्थेच्या विरोधात लढा दिला. म्हणूनच आज आपण आत्मविश्वासाने स्वावलंबी होण्याचे स्वप्न पाहू शकतो. देशाला सामाजिक प्रबोधनाची गरज आहे. मुलींनी पारंपरिक चौकटीला छेद देऊन मोठे ध्येय गाठावे, असे आवाहन अहेरी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे यांनी केले.
अहेरी तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा खमनचेरू येथे शुक्रवारला आयोजित प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी विविध स्पर्धा परीक्षांबाबत देखील त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च माध्यमिक शिक्षिका बी. डी. दुगा होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उच्च माध्यमिक शिक्षक प्रदीप लोहकरे, डी. डी. भोंगळे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन उच्च माध्यमिक शिक्षक जी.आर. बोकडे यांनी केले. माध्यमिक शिक्षक एस. एम. कोंकमुट्टीवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक पी. एम. बोरसे, व्ही. एन. बडगेलवार, विनायक सिडाम, एस. आर. वाहाणे, राहुल रामटेके, लिना खोब्रागडे, अमृता चांदेकर, आर. पी. दुर्गे, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.







