विदर्भ क्रांती न्यूज
गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रम आयोजित करून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. राकेश खंडेलवाल होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एच. पी. पारधी, डॉ. शशिकांत चौरे, डॉ. सुनील जाधव, प्रा. योगेश भोयर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. रवी रहांगडाले, डॉ. संजय जगणे व प्रा. घनशाम गेडेकर उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. खंडेलवाल म्हणाले, गांधी विचार ही काळाची गरज आहे. गांधी विचारताच देशाचे नव्हे जगाचे भले आहे. गांधी विचार टाळून आपण शाश्वत विकास साध्य करू शकणार नाही. भलेही भौतिक विकास साध्य करू. परंतु आत्मिक विकासासाठी गांधी विचारच आपल्याला तारणारे आहेत. त्यामुळे सर्वानी गांधी आणि शास्त्री यांच्या विचाराची कास धरावी, असे आवाहन डॉ. खंडेलवाल यांनी केले. यावेळी डॉ. एच. पी. पारधी यांनी गांधी विचार समजावून सांगून गांधी विचारांची प्रासंगिकता आजही तेवढीच आहे आणि येणाऱ्या काळात ती तेवढीच कायम राहणार असल्याचे सांगितले सोबतच लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. प्रा. घनशाम गेडेकर म्हणाले, जगात गांधी विचार आत्मसात केले जात असताना गांधींच्या देशात मात्र काही घटक गांधी विचारांची टवाळी करीत आहेत. गांधीजींनी आपल्या जीवनात केलेले कार्य, मांडलेले विचार आणि तत्कालीन परिस्थिती नीट समजावून घेण्याची नितांत गरज आजच्या समाज माध्यमी काळात आहे, असे सांगत गांधी विचारांचा केला जाणारा बदनामीकारक प्रसार कसा खोटा आहे हे, उदाहरणे देऊन प्रा. गेडेकर यांनी समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. योगेश भोयर तर आभार डॉ. सुनील जाधव यांनी मानले. यावेळी महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आला. विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. स्वच्छता अभियान आणि मिरवणुकीत राष्ट्रीय छात्र सेन (एनसीसी) व राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) विध्यार्थी सोबतच कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.