पोटेगाव आश्रमशाळेत गांधी व शास्त्री जयंती साजरी

45

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पोटेगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे होते. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून शाळेतील माध्यामिक शिक्षिका प्रमिला दहागावकर, पदवीधर प्राथमिक शिक्षिका मीनल शेट्टीवार, अधीक्षक एस. आर. जाधव, अधीक्षिका एल. आर. शंभरकर आदी उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना सुधीर शेंडे म्हणाले, सत्य व अहिंसाच्या माध्यमातून सत्याग्रह आंदोलने करणे, साधी राहणी उच्च विचारसरणी ही शिकवण जगाला महात्मा गांधी यांनी दिली. याचा अंगिकार सर्वांनी करावा. त्यांच्या विचारातून अहिंसावादी नवा प्रगत भारत निर्माण करण्यासाठी व जागतिक शांतता प्रस्थापित होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यातून आदर्श व त्यांच्यामधला प्रामाणिकपणा गुण घेऊन जीवनाची वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी इतर मान्यवर तसेच विद्यार्थी क्रीश नरोटे, करण पोटावी, अंकुश हीचामी, मंथन वड्डे, वनश्री कुमरे, आरती पुडो, सोनिया पोटावी, रोशनी पोटावी, मनिषा पोटावी, सोनाली पोटावी, माला नरोटे, वैष्णवी पोटावी यांनी गांधी व शास्त्री यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी व विद्यार्थ्यांंनी सहकार्य केले.