गडचिरोली जिल्ह्यातील गो तस्करी थांबवावी : युवा मोर्चाची खा. अशोक नेते यांच्याकडे मागणी

273

– हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या जात असल्याने गो तस्करीवर आळा घालण्यासाठी विशेष यंत्रणा बसवावी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : तमाम हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या जात असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील गो तस्करी त्वरित थांबविण्यात यावी, अशी मागणी धानोरा तालुका युवा मोर्चाने खा. अशोक नेते यांच्याकडे केली आहे.

गडचिरोली जिल्हा हा दोन राज्यांच्या सीमेला लागून असल्यामुळे या जिल्ह्यात गो तस्करी मोठ्या प्रमाणात होते. याचे मुख्य कारण म्हणजे हा जिल्हा नक्षलग्रस्त असल्यामुळे रात्री पोलिस गस्त घालू शकत नाही. त्याचप्रमाणे नाकाबंदी करू शकत नाही. याचा फायदा घेऊन गो तस्कर रात्री मोठ्या प्रमाणात छत्तीसगढ आणि महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात घेऊन जातात. यात राष्ट्रीय महामार्गाचा वापर होतो. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याशी बोलून गो तस्करी थांबविण्यासाठी विशेष यंत्रणा बसवावी, अशी मागणी युवा मोर्चाने केली आहे.
गो तस्करी होत असल्यामुळे तमाम हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या जातात. या भावनेचा विचार करून त्वरित गो तस्करी थांबवावी, अशी मागणी युवा मोर्चाचे जिल्हा सचिव सारंग साळवे, नगरसेवक संजीव कुंडू, नगरसेवक साजन गुंडावार, नगरसेवक सुभाष धाईत, तालुका प्रमुख घनश्याम मडावी, शहर प्रमुख सुभाष खोबरे, नगरसेवक राकेश दास, लंकेश मशाखेत्री, राकेश खरवडे, संजय मेश्राम, प्यारेलाल शेंद्रे, नरेश निमलवार, भुपतवार यांनी केली आहे.