उपेक्षित समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हीच खरी ईश्वरसेवा : आ. विजय वडेट्टीवार

116

– सिंदेवाही येथे १०१७ लाभार्थ्यांना घरकूल तर ३० दिव्यांगांना सायकलचे वितरण

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : समाजाप्रती असलेले ऋणानुबंध, जनसेवेसाठी लोकप्रतिनिधीच्या रूपातून मिळालेली संधी या जबाबदारीने कधीच स्वस्थ बसलो नाही. समाजातील उपेक्षित घटकांसाठी आपण चालविलेले प्रयत्नाचे चीज झाले. यातच आपल्याला ईश्वरीय सेवा करण्याचे भाग्य लाभले आणि समाजाची ऋण फेडण्यासाठी जबाबदारी प्राप्त झाली. या ईश्वरीयकार्यात खरे आत्मसमाधान असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सिंदेवाही येथे आयोजित यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने तहसीलदार जगदाळे, गटविकास अधिकारी सुक्रे, काँग्रेसचे ज्येष्ठ बाबुराव गेडाम, चन्ने, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे, शहराध्यक्ष सुनील उट्टलवार, नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, उपनगराध्यक्ष मयूर सूचक, वीरेंद्र जयस्वाल राहुल पोरेड्डीवार व नगरपंचायतीचे सर्व पदाधिकारी नगरसेवक व नगरसेविका, तालुक्यातील सर्व सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य तथा बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना आ. वडेट्टीवार म्हणाले की, मनुष्य जीवन जगताना प्रत्येक कुटुंबाचा एक स्वप्न असतं ते म्हणजे स्वतःच्या हक्काचा निवारा म्हणजे घर होय. आजवर शासनाने विमुक्त जाती व भटक्या जमातींना वगळून इतर सर्व समाजाकरिता विविध योजना अंतर्गत हक्काचे घर देण्याचे कार्य चालविले. मात्र मी मंत्रीपदावर विराजमान होताच समाजातील उपेक्षित असलेला विमुक्त जाती व भटक्या जमातींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने घरकुल योजनेस मंजुरी दिली. यात ब्रह्मपुरीत, सावली या तालुक्यासह शिंदेवाही तालुक्यात १०१७ घरकुलांना मंजुरी दिली असून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा ऐतिहासिक निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलेला असून याचा लाभ समाजातील गोरगरीब व उपेक्षित अशा विमुक्त जाती व भटक्या जमातींना मिळणार असून आपल्या हातून हे समाजकार्य घडल्याचे भाग्य लाभले. यासाठी मी ईश्वराचा ऋणी आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने आपण समाजकार्याचा जो व्हिडिओ उचलला त्याचे आज फलित म्हणून उपस्थित त्यांनी दिलेला आशीर्वाद व जनतेने दाखवलेला विश्वास हीच माझी खरी संपत्ती होय, असे प्रतिपादन यावेळी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि. प. शिक्षिका वसाके, प्रास्ताविक गटविकास अधिकारी सुक्रे तर आभार तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे यांनी मानले. कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने लाभार्थी वर्ग काँग्रेस कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते.

३० दिव्यांगांना स्वयंचलित सायकलीची वितरण
सामाजिक न्याय विभाग अंतर्गत सिंदेवाही तालुक्यातील राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाने एकूण 30 दिव्यांग बांधवांना स्वयंचलित सायकलचे वितरण करण्यात आले. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा असून समाजातील दिव्यांग बांधवांप्रती प्रेमभावना बाळगून मदतीचा हात देत त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आधार द्यावा, असे आवाहन आ. वडेट्टीवार यांनी याप्रसंगी केले.