– शेकापचा अमृत महोत्सवी वर्धापनदिन उत्साहात साजरा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने भांडवलशाहीच्या फायद्याचे धोरण अंमलात आणले असून सामान्य जनतेला जगणे कठीण केले आहे. त्यामुळे या सरकारविरोधात जनतेला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नसून भांडवलशाही विरोधात जगभरात आवाज बुलंद करणाऱ्या लाल बावट्याच्या नेतृत्वात जनतेने एकत्र यावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी नेते काॅ. डाॅ. महेश कोपूलवार यांनी केले.
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, बहुजन रिपब्लिकन सोशालिष्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोडे, जिल्हा प्रभारी राज बन्सोड, शेकाप महिला नेत्या जयश्री वेळदा, डॉ. गुरुदास सेमस्कर, तुकाराम गेडाम, चंद्रकांत भोयर, रमेश चौखुंडे, बाजीराव आत्राम, गुरवळाच्या सरपंच दर्शना भोपये, पुलखलच्या सरपंच सावित्री गेडाम, कोठीच्या सरपंच भाग्यश्री लेखामी, ग्रा. पं. सदस्य कविता ठाकरे, विलास अडेंगवार, देवेंद्र भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.
जागतिक राजकीय वारे आता बदलायला लागले असून वैचारिक निष्ठा आणि जनहितासाठी संघर्ष करणाऱ्या डाव्या पक्षांना पुन्हा मोठे जनसमर्थन मिळायला लागले असून नितिमत्ता सोडलेल्या धंदेवाईक राजकारणाचा तरुणांना विट आला असून राज्यात आणि जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षासह डावे आणि आंबेडकरवादी पक्ष नव्या दमाने उभारी घेतील, असा आशावाद शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केला.
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे प्रभारी राज बन्सोड, जयश्री वेळदा, डॉ. गुरुदास सेमस्कर, तुकाराम गेडाम यांनीही आपल्या मार्गदर्शनात केंद्रातील मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात आणि एकनाथ शिंदेंच्या भूमिकेविरोधात कडाडून टीका केली.
कार्यक्रमाचे संचालन युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर तर आभार देवेंद्र चिमनकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक किरंगे, रमेश गेडाम, देवराव शेंडे, भगवान मानकर, विनोद मेश्राम, राजकुमार प्रधान, विजया मेश्राम, पुष्पा चापले, कालिदास जराते, अनिकेत गेडाम, वैभव मानकर यांनी परिश्रम घेतले.