गडचिरोली येथे भाजपा जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात

55

– संघटनात्मक व आगामी कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत झाली चर्चा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारिणी बैठक येथील गानली सभागृहात शनिवारी उत्साहात पार पडली. या बैठकीत संघटनात्मक व आगामी कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला विदर्भ विभाग संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, विधान परिषदेचे आमदार व जिल्हा प्रभारी डॉ. रामदास आंबटकर, जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, ज्येष्ठ नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, भाजपा नेते व पूर्व विदर्भ ओबीसी मोर्चाचे संपर्कप्रमुख बाबूराव कोहळे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, प्रशांत वाघरे, गोविंद सारडा, प्रमोद पिपरे आदी मंचावर उपस्थित होते.

या कार्यकारिणी बैठकीत बुथ सक्षमीकरण व सशक्तीकरण या विषयावर आमदार डॉ. आंबटकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले व यासंदर्भात भाजपातर्फे एका विशेष अ‍ॅपचे सादरीकरण व प्रशिक्षण कार्यकर्त्यांसमोर आनंद खजांची यांनी केले. यावेळी डॉ. आंबटकर यांनी सशक्त बुथ हाच भारतीय जनता पार्टीचा कामाचा आधार असून कार्यकर्त्यांनी बुथ संरचना पूर्ण करुन प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करावे, असे आवाहन केले.
या बैठकीत दोन प्रस्ताव पारीत करण्यात आले. यामध्ये आमदार डॉ. होळी यांनी राजकीय प्रस्ताव मांडताना शासनाच्या निरनिराळ्या योजनांसोबतच गडचिरोलीत मेडीकल कॉलेजच्या निर्मितीची घोषणा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आपल्या पहिल्याच भेटीत गडचिरोली येथे केली,. याबद्दल विशेष आभार मानण्यात आले. तर कृषि विषयक प्रस्ताव सादर करताना आमदार कृष्णा गजबे यांनी गडचिरोलीतील पूरपरिस्थितीच्या संदर्भात मदतीबद्दल शासनाचे आभार मानून शेतकर्‍यांसाठीच्या विविध योजना शिंदे सरकारने निर्माण केल्या आहेत. त्या जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन केले.
बैठकीचा समारोप विदर्भ विभाग संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी केला. यावेळी त्यांनी सरकारच्या अनुकुलतेचा लाभ पक्ष संघटनेसाठी घेऊन आगामी निवडणुकांची तयारी करावी व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घर घर तिरंगा हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन केले. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.