– संताजी सोशल मंडळ गडचिरोलीच्या वतीने तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : विकास ही संज्ञा अतिशय गतिशील आणि किचकट आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये विकास होण्याकरिता शिक्षण हाच मुळ पाया आहे. म्हणुन विद्यार्थ्यांनी शिक्षणातून स्वतःची ओळख निर्माण करून सामाजात एक विशेष स्थान निर्माण करावे. तसेच ओबीसी समाजाला शैक्षणिक, सामाजिक व राजकीय आरक्षण मिळायला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे यांनी केले.
स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दालनामध्ये संताजी सोशल मंडळ गडचिरोलीच्या वतीने तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन ते बोलत होते.
तेली समाजातील १० व १२ वी मध्ये ८० टक्केच्या वर गुण प्राप्त करण्याऱ्या ५५ गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच उच्च शिक्षण घेत असलेल्या पाच उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्था अध्यक्ष श्री. भाग्यवानजी खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपविभागीय वन अधिकारी (नागपूर वनविभाग) व डॉ. प्रशांत चलाख यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांनी सुध्दा उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा (दक्षिण) जिल्हाध्यक्ष प्रभाकरराव वासेकर, विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हाध्यक्ष सुरेशराव भांडेकर, देवाजी सोनटक्के, गोपीनाथ चांदेवार, रामदासजी कुनघाडकर, अनिल बालपांडे, राजेश इटनकर तसेच संताजी सोशल मंडळ गडचिरोलीचे सर्व सदस्य, विद्यार्थी, पालक व समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी यांनी केले. संचालन रामराज करकाडे तर आभार सुधाकर लाकडे यांनी मानले.