कोणत्याही परिस्थितीत कमलापूर, पातानील येथील हत्ती हलवू देणार नाही : खा.अशोक नेते

112

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील कमलापूर व पातानील येथील 11 हत्ती गुजरात राज्यात हलविण्यात येणार आहे अशी चर्चा लोकांमध्ये असून या बाबतीत येथील लोकांत प्रचंड रोष असून लोकांच्या भावना या बाबतीत तीव्र असून कोणत्याही परिस्थितीत येथील हत्ती हलवू देणार नाही, अशी ग्वाही गडचिरोली -चिमूर क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी शुक्रवारी आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात पत्रपरिषदेत दिली.

कमलापुर आणि पातानील येथील 11 हत्ती गुजरात येथे हलविण्यात येणार आहे. हत्ती हलविण्याबाबत असे कुठलेही पत्र वनविभाग आलापल्लीकडे आले नसून फक्त ही अफवा आहे. विरोधकांना आपल्याला या आडून बदनाम करण्याचा डाव आहे, असेही खा. नेते म्हणाले. हत्ती पाठविण्याचा निर्णय राज्याचा असतो त्यात केंद्राची कोणतीही भूमिका नसते.
4 महिन्याआधी असेच पेपर, सोशल मीडियामधून हत्ती हलविन्यात येणार असल्याचे प्रसारमाध्यमात बातम्या प्रसारित झाले होते. त्यावेळी निरथर्क बातम्या होत्या, पुन्हा तेच होत आहे. यासंदर्भात उपवनसंरक्षक आलापल्ली राहुल टोलिया यांना खा. नेते यांनी विचारणा केली असता हत्ती हलविण्यासंदर्भात कोणतेही पत्र आपल्या कार्यालयाला प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. आपण याबाबत केंद्रीय उपसंचालक वन्यजीव सुनील शर्मा यांची ही या प्रश्नी भेट घेऊन पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने कमलापूर व पातानील येथील हत्तींच्या सांगोपणाकडे लक्ष देण्यासाठी सोईसुविधा उपलब्ध करून द्यावा.प्रशिक्षित महावत,हत्तींच्या देखभालीसाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करावी एक मोठे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी राज्यशासनाने जातीने लक्ष द्यावे यात खा. म्हणून आपणही आपला वाटा नक्कीच देऊ, असे ते म्हणाले. डीपीडीसी व दिशा समितीच्या माध्यमातून कमलापूर व पातानील येथील सोईसुविधा पुरविण्यासाठी व पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही खा. नेते यांनी पत्रपरिषदेत दिली.
या पत्रपरिषदेला जेष्ठ नेते बाबूराव कोहळे, संघटन महामंत्री रवी ओल्लालवार, आदिवासी आघाडी कार्यकारी जिल्हाध्यक्ष संदीप कोरेत, जिल्हा सचिव विनोद अकँनपल्लीवार, तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, पोशालू सुदरी, मोहन मदने, सागर डेकाटे आदींची उपस्थिती होती.