४८ बंगाली निर्वासित गावांच्या मुलभूत सोयी सुविधांचा प्रश्न मार्गी लागणार : आमदार डॉ. देवरावजी होळी

125

– ४८ बंगाली निर्वासित गावांच्या मुलभूत सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना मंत्री महोदयांनी केली सूचना

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी विधानसभेत प्रश्‍न मांडून मदत व पुनर्वसन मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून घेतले होते विधिमंडळात आश्वासन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ४८ बंगाली निर्वासित गावांना मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत ७ मार्च २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी तारांकित प्रश्न मांडून विधिमंडळाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावेळी उपस्थित मदत व पुनर्वसन मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सदर प्रश्न निकालात काढला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी गडचिरोली यांना या संदर्भात तातडीने अहवाल सादर करण्याची सूचना त्यांनी केली असून आता या गावांना मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर झाला असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले आहे.

आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी याबाबत सातत्याने राज्य सरकारकडे पत्र व्यवहार, मंत्रालयीन स्तरावर बैठका इत्यादी मार्गाने पाठपुरावा करीत आहेत. परंतु या गावांना मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यावरून विधानसभेत तारांकित प्रश्‍न मांडून सदर मुद्दा उपस्थित केला असता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल आवश्यकता वाटल्यास बैठक बोलावली जाईल, असे आश्वासन विधिमंडळाला दिले होते. त्यावरून आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मंत्री महोदयांना पत्र लिहून दिलेल्या आश्वासनाबाबत अवगत केले. त्यावरून त्यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना याबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असा आशावाद देवरावजी होळी यांनी व्यक्त केला आहे.