२५ टक्के कमिशन घेणाऱ्या मजूर सहकारी संघावर गुन्हे दाखल करा

58

– आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून विधानसभेत मागणी

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा तारांकित प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनीही पॉईंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून उपस्थित केलेला मुद्दा

– जिल्ह्यातील १८ ही बोगस मजूर सहकारी संस्थांंची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची केली मागणी

– विधानसभेत गाजला बोगस मजूर सहकारी संस्थेचा मुद्दा

– प्रकरण तपासुन घेतले जाईल असे सहकार मंत्र्यांचे उत्तर

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मजूर सहकारी संघाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामांमध्ये २५ टक्‍क्‍यांहून अधिक कमिशन घेतले जात असून मजूर सहकारी संस्थेच्या नावावर जिल्हा मजुर सहकारी संघाने स्थानिक कंत्राटदारांकडून मोठी लूट चालवली असल्याचा आरोप करीत जिल्हा मजूर सहकारी संघावर व मजुर सहकारी संस्थांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी विधानसभेत तारांकित प्रश्‍नाच्या माध्यमातून राज्य सरकारला केली.

आरमोरी तालुक्यातील दत्त विशाल मजूर सहकारी संस्थेने ९ कोटीचा अपहार केला.याबाबत पोलिसात तक्रार होऊनही अद्याप पर्यंत मजूर सहकारी संस्थेच्या अध्यक्षांवर व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले नाही . त्याच प्रकारे जिल्हा मजूर सहकारी संघाच्या मार्फतीने कंत्राटदारांकडून २५ टक्‍क्‍यांहून अधिक कमिशन घेऊन कामामध्ये मोठी लूट केली जात आहे. याबाबत मागील वर्षभरापासून तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही केले जात नसल्याने विधानसभेच्या माध्यमातून त्यांचीही चौकशी केली जावी व त्यांच्यावर गून्हे दाखल करण्यात यावे अशीही मागणी केली.
तसेच या संदर्भात गृहमंत्री व सहकार मंत्र्यांनी बैठकीचे आयोजन करून या संदर्भात आलेल्या तक्रारीची तातडीनं दखल घ्यावी अशीही मागणी या प्रश्नाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली.
यावेळी मंत्री शंभुराजे देसाई यांनी याबाबत चौकशी करण्यात आली असून सहाय्यक निबंधक यांनी दिलेला बनावट अहवाल वाचून दाखविला. त्यामध्ये असलेल्या मजकूरा नुसार या प्रकरणात कोणतेही तथ्य आढळून आलेले नसल्याची बाब विधानसभेत विशद केली . सदर प्रश्न हा सहकार विभागाचा असल्याने त्याचा गृह विभागाशी चौकशीचा संबंध नाही. त्यामुळे यासंदर्भात देण्यात आलेल्या तक्रारीवर सहकार विभागाच्या माध्यमातून निर्णय घेतला जाईल असे निवेदन केले.

यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी पॉईंट ऑफ प्रोसिजर च्या माध्यमातून सदर प्रश्न अतिशय योग्य असून राज्यातील सर्व बोगस मजूर सहकारी संघाची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादित केले. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीणजी दरेकर यांच्या विरोधात बँकेकडून व सहकार विभागाकडून कोणतीही तक्रार नसताना त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे जर सहकार विभागाच्या प्रश्नांमध्ये पोलिसांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसेल तर पोलिसांनी प्रवीण दरेकर यांच्या प्रकरणात का हस्तक्षेप केला. सत्ताधारी पक्षाला एक न्याय व विरोधी पक्षांना दुसरा न्याय असे या सरकारचे धोरण असल्याची टीका केली. आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी विचारलेला प्रश्न अतिशय योग्य असून या प्रश्नाची तात्काळ चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी मंत्री शंभुराजे देसाई यांनी प्रकरण तपासुन घेतले जाईल, असे आश्वासनात्मक उत्तर दिले.