सौर ऊर्जा ही सार्वजनिक चळवळ होण्यासाठी प्रा. सोलंकी यांनी हाती घेतली सौर बसव्दारे 11 वर्षांची ऊर्जा स्वराज यात्रा

140

– 11 वर्ष सौर बसमध्येच मुक्काम, ऊर्जा स्वराज्य यात्रेतून करणार जनजागृती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरिली : ग्लोबल वार्मिंग जगात गंभीर समस्या बनू पाहत आहे. ग्लोबल वार्मिंग 1.5 डिग्री सेल्शियसपर्यंत पोहचण्याआधी आपल्याकडे 8-10 वर्षे शिल्लक आहेत. त्यामुळे जलवायू परिवर्तन कमी करण्यासाठी कृती आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर ऊर्जेची निर्मिती करणे आणि वापर करणे हा उपाय आहे. सौर ऊर्जा ही सार्वजनिक चळवळ व्हावी यासाठी आयआयटी मुंबईचे प्रा. चेतनशिंह सोलंकी यांनी सौर बसद्वारे 11 वर्षांची ऊर्जा स्वराज यात्रा हाती घेतली आहे. या प्रवासात प्रा. सोलंकी हे तब्बल 11 वर्षे घरी न जाता सौर बसमध्ये राहून यात्रा करण्याचा संकल्प केला आहे. या ऊर्जा स्वराज्य यात्रेतून ते जनजागृती करणार असल्याची माहिती आज, 11 फेब्रुवारी रोजी येथील गोंडवाना विद्यापीठात आयोजित पत्रपरिषदेत दिली आहे. या पत्रपरिषदेला आयआयटी मुंबईचे प्रा. चेतनसिंह सोलंकी यांंच्यासह गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, डॉ. मनीष उत्तरवार यांची उपस्थिती होती.

सौर ऊर्जा ही ग्लोबल वार्मिंगच्या संकटावरील रामबाण उपाय आहे हे या यात्रेच्या माध्यमातून सांगणार आहेत. ऊर्जा स्वराज या आंदोलनाच्या माध्यमातून ऊर्जेचा वापर, शाश्वतता, ग्लोबल वार्मिंगवर नियंत्रण कसे मिळवता येईल हे सांगणार आहेत. ग्लोबल वार्मिंग हा जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. जगातील सर्वच प्रमुख देश यावर सातत्याने चिंतन, संशोधन व अनुषंगिक प्रयत्न करत आहेत. मात्र सरकारी प्रयत्न हे पुरेसे नाहीत. ऊर्जेचा उपयोग करणारी प्रत्येक व्यक्ती ही ग्लोबल वार्मिंगला जबाबदार आहे. यावर वेळीच नियंत्रण केले नाही तर भविष्यात निसर्गचक्र धोक्यात येईल आणि जीवनाच्या अस्तिवाचा धोका निर्माण होईल. यावर सौर ऊर्जेचा वापर हा एकमात्र आणि सरळ, सोपा पर्याय असून जीवनाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे, असे आवाहन सोलार गांधी म्हणून विख्यात असलेले आयआयटी मुंबई येथील प्रा. डाॅ. चेतनसिंह सोलंकी यांनी केले.
ऊर्जा ही प्रत्येकाच्या जीवनाची गरज आहे. त्यामुळे ऊर्जेचा उपयोग करणारा प्रत्येकजण ग्लोबल वार्मिंगसाठी जबाबदार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने यावरील परिवर्तनाच्या लढाईत सहभागी झाले पाहिजे. त्यासाठी ऊर्जा साक्षरता अभियान सुरू केले असल्याचे प्रा. सोलंकी यांनी पत्रपरिषदेत सांगितले.