– गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसतर्फे कडक कारवाई संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : नीट परीक्षा पेपर लीक प्रकरण, पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस दरवाढ तसेच युवकांबाबत करण्यात आलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसतर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात संबंधित केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून शासनाच्या निष्काळजीपणा व भ्रष्टाचारामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. गरीब, शेतकरी व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षा देतात. मात्र पैशांच्या जोरावर व भ्रष्ट मार्गाने पेपर फुटल्याने त्यांच्या कष्टांची किंमत उरलेली नाही. या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी गॅसच्या सतत वाढणाऱ्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महागाईमुळे सामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले असून शासनाने इंधन दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच युवकांबाबत करण्यात आलेल्या “युवा काकरोच की तरह होते हैं” या कथित वक्तव्याचाही तीव्र निषेध करण्यात आला. हे वक्तव्य युवकांचा अपमान करणारे व असंवेदनशील असल्याचे सांगत संबंधितांनी सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई न केल्यास युवक रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. संबंधित निवेदन नायब तहसीलदार फुलझले यांना देण्यात आला.
यावेळी निवेदन देताना गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, एन. एस. यू. आय. चे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, चामोर्शी तालुका सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष विजय लाड, जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत राऊत, चामोर्शी तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रेमानंद गोगले, सुभाष कोठारे, अमर मोगरे, विलास चिचघरे, हेमंत कोवासे, आयुष पाल, विवेक बोदलकर, अमित किनेकर, तमन्ना पठाण, सागर मेश्राम, खुशबू हजारे, पायल कुलसंगे, सारिका धोटे, कृष्णा तिवाडे, अमिषा जुनघरे, छकुली हुलके, खुशाल हुलके, पायल शेंडे, हर्षदा चुदरी, सानिका निसार, प्रांजली बोदलकर, दीप्ती कोहळे, सरगम चिडंगे, आनंदी गोवर्धन, गणेश चलाख, लौकिक दुधबावरे, श्रीकांत बुरांडे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.







