– नागरिकांनी 19 मे पूर्वी औषधे घेऊन ठेवावीत : संतोष ताटीकोंडावार
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टच्या आवाहानानुसार बुधवार, 20 मे 2026 रोजी देशभरातील सर्व मेडिकल स्टोअर्स बंद ठेवण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
केमिस्ट बांधवांच्या विविध मागण्यांसाठी 20 मे 2026 रोजी देशभरातील सर्व औषध दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांची सुरक्षितता, केमिस्टचा सन्मान, आरोग्यदायी भारताची शान या घोषवाक्याखाली हा बंद पुकारण्यात आला आहे.
20 मे रोजी आरोग्यविषयक संरक्षणासाठी आयोजित देशव्यापी फार्मसी बंदमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी विशेष आवाहन केले आहे. आपणास अत्यावश्यक असलेली सर्व औषधे 19 मे 2026 पूर्वी आपल्या जवळील फार्मसीमधून प्राप्त करून घ्यावीत. बंदमुळे होणारी गैरसोय टाळावी, असे ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलताना संतोष ताटीकोंडावार म्हणाले, केमिस्ट बांधवांच्या मागण्या रास्त आहेत.ऑनलाईन औषध विक्री आणि बनावट औषधांमुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.बंदच्या दिवशी emergency सेवेसाठी रुग्णालयातील औषध दुकाने सुरू राहतील. परंतु नागरिकांनी खबरदारी म्हणून 19 तारखेपर्यंत आवश्यक औषधांचा साठा करून ठेवावा. असुविधेबद्दल आम्ही दिलगीर आहोत, पण समाजाचे आरोग्य सुरक्षित करणे हेच आमचे ध्येय आहे.”
दरम्यान, या बंदमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सर्व केमिस्ट सहभागी होणार असल्याची माहिती आहे.नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन संतोष ताटीकोंडावार यांनी केले आहे.







