– पूर्वसूचना नसल्याने नागरिकांचा संताप
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अहेरी येथील तालुका मुख्यालयी असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेचा कारभार सध्या पूर्णपणे विस्कळीत झाला असून, प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, गेल्या जुलै महिन्यापासून या शाखेला स्थायी मॅनेजर (कायमस्वरूपी व्यवस्थापक) नसल्याने बँकेचे कामकाज ‘रामभरोसे’ सुरू असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

काल, १५ जानेवारी रोजी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक असल्याने बँकेतील कर्मचारी मतदानासाठी गेले आहेत, असे कारण सांगत बँकेचे शटर गुरुवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. “निवडणुकीमुळे व्यवहार बंद राहतील” असा फलक लावून बँक बंद करण्यात आल्याने लांबून आलेल्या शेतकऱ्यांची आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली. बँक अचानक बंद ठेवल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाला काही रोकठोक प्रश्न विचारले आहेत.
बँकेतील सर्वच कर्मचारी नागपूरचे रहिवासी आहेत का?, जर कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी द्यायची होती, तर तशी पूर्वसूचना जबाबदारी समजून आदल्या दिवशी ग्राहकांना का देण्यात आली नाही?, तालुक्यातील शेतकरी आणि व्यापारी आपला वेळ आणि पैसा खर्च करून बँकेत येतात, त्यांच्या कामाच्या नुकसानीला जबाबदार कोण?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जुलै महिन्यापासून कायमस्वरूपी मॅनेजर नसल्याने कर्ज प्रकरणे, महत्त्वाच्या कागदपत्रांवरील स्वाक्षऱ्या आणि इतर तांत्रिक कामे रखडली आहेत. त्यातच अशाप्रकारे अचानक बँक बंद ठेवल्याने नोकरदार, व्यापारी आणि विशेषतः पीक विम्यासाठी व इतर कामांसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत.
प्रशासनाविरोधात तीव्र रोष बँकेच्या या मनमानी कारभारामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
“वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन या शाखेला कायमस्वरूपी मॅनेजर द्यावा आणि भविष्यात अशा प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करावी. वारंवार इशारा देऊनही बँक प्रशासनाला जाग येत नाही.आता त्यांची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही.
– संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ता अहेरी”







