Home गडचिरोली अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे गडचिरोलीत शालेय विद्यार्थ्यांची ग्राहक जनजागृती रॅली

अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे गडचिरोलीत शालेय विद्यार्थ्यांची ग्राहक जनजागृती रॅली

47

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाच्या निमित्ताने अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गडचिरोली जिल्हा यांच्या वतीने ग्राहक जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत वसंत विद्यालय गडचिरोली येथील शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. “जागो ग्राहक जागो”, “ग्राहक हक्क आमचा अधिकार”, “फसवणुकीला नाही, जागरूकतेला होकार” अशा विविध घोषणांनी रॅलीदरम्यान परिसर दुमदुमून गेला.

या रॅलीला अखिल भारतीय ग्राहक पंचायत गडचिरोली जिल्हाध्यक्ष उदय धकाते, विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत पतरंगे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे उपाध्यक्ष विजय साळवे, सदस्य एम. डी. मेश्राम, सतीश धाईत, महिला सदस्य मीरा बिसेन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वसंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुचिता कामडी, सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे उपाध्यक्ष विजय साळवे यांनी प्रास्ताविकातून अखिल भारतीय ग्राहक पंचायतची स्थापना, कार्यपद्धती व उद्दिष्टे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी हातात फलक व बॅनर घेऊन ग्राहकांचे हक्क, योग्य बिल घेण्याचे महत्त्व, वजन-मापातील अचूकता, भ्रामक जाहिरातींपासून सावधगिरी आणि ऑनलाईन व्यवहारात दक्षता याबाबत नागरिकांमध्ये जागृती केली. नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष उदय धकाते यांनी ग्राहकांनी सजग राहणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सोबतच ग्राहक हक्कांचे संरक्षण, जनजागृती आणि न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कशा प्रकारे कार्य करते, याची माहिती त्यांनी दिली. विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत पतरंगे यांनी “विद्यार्थीदशेतच ग्राहक जागरूकतेचे संस्कार झाले तर भविष्यात समाज अधिक सक्षम बनेल,” असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका सुचिता कामडी यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे असे उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या कार्याचे कौतुक केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या या प्रचार-प्रसार व जनजागृती अभियानामुळे ग्राहक हक्कांविषयी समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे सांगितले.

error: Content is protected !!