Home गडचिरोली डे – नाईट कबड्डी स्पर्धेचे डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते उद्घाटन

डे – नाईट कबड्डी स्पर्धेचे डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते उद्घाटन

56
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहरातील काँम्पलेक्स टी–पाँईट चौक परिसरात स्वप्नझेप करिअर अकॅडमी युवा क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य डे–नाईट कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व क्रीडाभावनेच्या वातावरणात पार पडला. या रंगतदार कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते फीत कापून जल्लोषात संपन्न झाले.

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना मा. खा. डॉ. अशोकजी नेते म्हणाले, “कबड्डी खेळताना पंचांचा निर्णय अंतिम मानणे हीच खरी क्रीडाभावना आहे. पंचांचा निर्णय मान्य केला तर कोणतेही वाद-विवाद, तंटे निर्माण होत नाहीत. कबड्डी हा सांघिक व मैदानी खेळ असून तो शरीरसुदृढता, शिस्त, तंदुरुस्ती आणि संघभावना निर्माण करतो. एक काळ असा होता की कबड्डी हा खेळ लोप पावण्याच्या मार्गावर होता; मात्र आज तो पुन्हा नव्या लोकप्रियतेने युवकांच्या मनात स्थान मिळवत आहे. स्वप्नझेप करिअर अकॅडमीमधील युवक पोलीस भरतीसाठी मेहनत घेत असून, त्यांना तसेच या क्रीडा उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा देतो,” असे प्रतिपादन उद्घाटनप्रसंगी मा. खा. डॉ. नेते यांनी केले.

यावेळी आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे व माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनीही युवकांना क्रीडाक्षेत्रात सक्रिय राहण्याचे तसेच पोलीस भरतीसारख्या स्पर्धात्मक प्रक्रियेत शिस्त, मेहनत व सातत्य ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.

उद्घाटनानंतर मान्यवरांच्या हस्ते मैदानात टॉस करण्यात आला. खेळाडूंशी हस्तांदोलन करून सर्व संघांना शुभेच्छा देण्यात आल्या. भव्य प्रकाशयोजनेत सुरू झालेल्या सामन्यांनी उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

या कार्यक्रमास आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, कि. मो. प्र. सचिव रमेशजी भुरसे, जेष्ठ नेते डॉ. भारतजी खटी, माजी पं. स. उपसभापती विलास दशमुखे, सामाजिक नेते परमानंद पुनमवार, मोहन ठाकरे, स्वप्नझेप करिअर अकॅडमीचे संचालक सुमित चव्हाण, जितेश कुकुडकर, प्रशांत कोटगले, भोयर, रंजित रामटेके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच स्वप्नझेप करिअर अकॅडमीचे विद्यार्थी–विद्यार्थिनी, युवक खेळाडू आणि क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामन्यांचा मनसोक्त आनंद घेतला. भव्य प्रकाशझोतात पार पडलेल्या या डे–नाईट कबड्डी स्पर्धेमुळे गडचिरोली टी–पाँईट चौक परिसरातील क्रीडा संस्कृतीला नवे बळ मिळाले असून, युवकांना क्रीडा व शारीरिक तंदुरुस्तीची प्रेरणा देणारा हा उपक्रम निश्चितच दिशादर्शक ठरत आहे.

error: Content is protected !!